मुंबई | Mumbai
लोकसभेतील अपयश विसरून प्रचंड सूक्ष्म नियोजनाने महायुतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजय संपादन केला. महायुतीच्या प्रचंड लाटेपुढे महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता महाविकास आघाडीतील पक्षाचे प्रमुख नेतेही ईव्हीएमविरोधातील भूमिकेवर एकमताने पुढे जात असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पराभूत आमदारांची आज मुंबईत बैठक झाली. या बैठकीत ईव्हीएम आणि एकूणच मतांची गोळाबेरीज जुळत नसल्याने त्याविरोधात एल्गार पुकारण्याची भाषा केली आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी पराभूत उमेदवारांची बैठक मुंबईतल्या बॅलार्ड इस्टेट येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात संपन्न झाली. यावेळी महायुतीकडून वापर करण्यात आलेल्या संसाधनांचा आपल्या उमेदवारांशी साधर्म्य असलेले उमेदवार तसेच ईव्हीएम आदींबाबत पराभूत उमेदवारांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत उमेदवारांनी केलेल्या तक्रारी संदर्भात एक वकिलांची टीम करण्याचा निर्णय पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी घेतला आहे. राज्य पातळीवर एक आणि केंद्रीय पातळीवर कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठीत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. शरद पवारांकडून केवळ आरोप करण्यापेक्षा ईव्हीएमबाबत जे आक्षेप आहेत किंवा निवडणूक प्रक्रियेत ज्या चुकीच्या बाबी घडल्या ते सर्व पुरावे गोळा करण्याच्या सूचना देखील उमेदवारांना देण्यात आल्या आहेत.
२८ तारखे पर्यंत व्हीव्हीपॅट तपासणीसाठी वेळ असल्याने उमेदवारांनी तत्काळ व्हीव्हीपॅट तपासणी करावी अशी ही सूचना देण्यात आली आहे. त्यासंदर्भातील पत्राचा एक नमूना देखील शेअर करण्यात आला आहे. राज्य पातळीवर ज्या प्रकारे या लढाईला सुरूवात करण्यात आली, त्याच प्रमाणे इंडिया आघाडी देखील लढाई लढणार असल्याची माहिती शरद पवारांनी उमेदवारांना दिली आहे. तर, आता मागे हटायच नाही, लढायचं, असा ऊर्जात्मक संदेशही शरद पवारांनी पराभूत उमेदवाराना दिला आहे.त्यामुळे, ईव्हीएमविरोधातील लढाई आता तीव्र होणार असल्याचे दिसून येते.
भारताचा लवकरच रशिया होणार – जितेंद्र आव्हाड
बैठकीबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमवर सर्वांत जास्त प्रश्न उपस्थित केले. भारताचा लवकरच रशिया होणार आहे. व्लादिमीर पुतीनने जसे रशियातून विरोधकांना हद्दपार केले, त्याच पद्धतीने भारतात विरोधी पक्षच ठेवायचा नाही. त्यांचे अस्तित्व मिटवून टाकायचे, हा यांचा डाव दिसतोय. आम्ही ईव्हीएमवर आत्ताच प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय असे नाही. मागेही आम्ही यावर बोललो आहोत. ईव्हीएमविरोधात आपण ठाम भूमिका घेतली पाहिजे, अशी पक्षातील बहुतांश जणांची भावना असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. तसेच यासंदर्भात न्यायालयीन लढा लढण्यासाठी वकिलांची टीम तयार करण्याच्या सूचना दिल्याचीही माहिती मिळत आहे.
उध्दव ठाकरेंनी देखील पराभूत झालेल्या उमेदवारांना बोलवले होते. ईव्हीएममधील घोळासंदर्भात सर्वांनी आपले म्हणणे मांडले. मतदानात तफावत आहे. ५ टक्के व्हीव्ही पॅटची तपासणी होण्यासाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. माझ्या मतदारसंघात १० उर्दू शिक्षिकांना बुरखा घालून बसायला सांगितले होते, अशी माहिती ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार दिपेश म्हात्रे यांनी दिली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा