कर्जत । वार्ताहर
कोणाचाही नाद करा परंतु पवारांचा नाद करू नका. पवार एवढे सोपे नाहीत हे आपल्याला लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे, असा इशारा खासदार निलेश लंके यांनी आमदार राम शिंदे यांचे नाव न घेता दिला आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघाची जबाबदारी घेण्यास मी तयार आहे, असा दावाही त्यांनी केल्याने राजकीय भुवया उंचावल्या आहेत. तालुक्यातील मिरजगाव येथे शरद पवार राष्ट्रवादीचे आ.रोहित पवार यांनी शुक्रवारी राजकीय मेळावा भरवला. कार्यक्रमात खा.लंके, खा.अमोल कोल्हे, खा.धर्यशील मोहिते यांच्या टोलेबाजीचा बहर होता.
रोहित पवार महाराष्ट्राचे नेतृत्व आहे, असा दावा खासदार अमोल कोल्हे यांनी केला. राज्यातील जनतेने लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या शक्तीला पराभूत केले आहे व आगामी विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होणार आहे. त्यामुळे कर्जत-जामखेड एमआयडीसीच्या फाईलवर मंत्री म्हणून आ.रोहित पवार हेच सही करतील, असे ते म्हणाले.
तोच धागा पकडत आमदार रोहित पवार यांनी सत्ताधार्यांवर केवळ राजकीय द्वेषातून एमआयडीसी अडविल्याचा आरोप केला. ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. तीन महिन्यानंतर जनतेच्या आशीर्वादाने आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या सहीनेच हे काम मार्गी लागेल. \
माजी आमदार नारायण पाटील, साहेबराव दरेकर, गुलाब तनपुरे, डॉ.पंढरीनाथ गोरे, बाळासाहेब साळुंखे, रघुनाथ काळदाते आदी उपस्थित होते.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीआधी लंके-शिंदे यांच्यातील दोस्ती प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेकदा उमटून आली. त्यामुळे खा.लंके यांचा इशारा आ.शिंदे यांच्यासाठीच होता की अन्य कोणासाठी, याचीही चर्चा रंगली आहे.