मुंबई | Mumbai
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर इंडिया’ अंतर्गत, काल रात्री भारताने पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर जबरदस्त हवाई कारवाई केली. पाकिस्तानला कानोकान खबर होऊ न देता भारतीय सैन्याने बुधवारी (ता. 7 मे) मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील एकूण ९ दहशतवादी तळांना लक्ष्य केले. यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय सैन्याने केलेल्या या हल्ल्याचे राजकीय नेतेमंडळींकडून कौतुक करण्यात येत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या कारवाईचे कौतुक केले आहे.
आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 7, 2025
आज बुधवारी सकाळी त्यांनी ट्वीट करत भारतीय सैन्य दलाचे कौतुक केले. त्यानंतर काही वेळापूर्वीच त्यांनी माध्यमांशी संवाद साधत ऑपरेशन सिंदूरवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुकही केले. भारतीय नेतृत्व आणि भारतीय सेना यांच्यामध्ये कोणतेही अंतर नाही हे जगाला कळले. आज सगळा देश AIR फोर्सच्या पाठीमागे आहे, या सोबतच हा हल्ला करताना भारत आक्रमक झालेला नाही, याची काळजी आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली, असे म्हणत पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सैन्याच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
यावेळी ते म्हणाले की, असे आहे की गेल्या आठवड्यात जे काही काश्मीरमध्ये घडले, त्यामुळे देशातील लोकांमध्ये अस्वस्थता होती. ज्यांचा काही संबंध नाही, अशा लोकांना मारण्यात आले. यामध्ये कोणत्याही सरकारला बघ्याची भूमिका घेणे शक्य नव्हते. पण हे करत असताना काळजीपूर्वक निर्णय घेणे गरजेचे होते. भारत आणि पाकिस्तान यामध्ये पीओके जो काश्मीरचा भाग तो 1947-48 साली त्यांनी घेतला. तिथेच हा हल्ला करण्याचे स्थान केंद्रित केल्याचे दिसते. पीओके हे दहशतवाद्यांचे ठिकाण आहे. तिथेच यांचा दारुगोळा ठेवला जातो, ही मदत पाकिस्तानकडून केली जाते. त्यामुळे जे हल्ले झाले ते पाकव्याप्त काश्मीरात झाले आहेत, असे पवारांनी सांगितले.
ते पुढे असे ही म्हणाले की, आणखी एक बदल दिसला तो म्हणजे काश्मीरमध्ये जे काही झाले त्यांनतर देशातील काही लोकांच्या मनात काश्मिरी लोकांबाबत शंका होती. जम्मू काश्मीर विधानसभेत अधिवेशन घेऊन या हल्ल्याचा निषेध केला गेला. मुख्यमंत्री यांनी भाषणात त्यांनी स्वच्छ भूमिका घेतली. भारतीय नेतृत्व आणि भारतीय सेना यांच्यामध्ये कोणतेही अंतर नाही हे जगाला कळले आहे, असे शरद पवार म्हणाले.
पहलगाममधील हल्ल्यानंतर सर्वपक्षीय बैठक झाली. त्या बैठकीला आमच्या पक्षाकडून खासदार सुप्रिया सुळे हजर होत्या, तेव्हा आम्ही सरकारच्या पाठिशी उभे राहू असा निर्णय घेतला. त्यामुळे हवाई दल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जी काही कारवाई केली त्यांच्यामागे आम्ही उभे आहोत. आंतरराष्ट्रीय पातळीवर हे सर्व काही जपून केले पाहिजे, या हल्ल्यानंतर अमेरिका, जपान आणि काही महत्त्वाच्या देशांनी भारताला समर्थन दिले, पण चीनने समर्थन दिले नाही ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे, असेही यावेळी शरद पवारांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




