मुंबई | Mumbai
बॉलिवूडचा अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर मध्यरात्रीच्या सुमारास वांद्रे (Bandra) येथील राहत्या घरी जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सदर दुर्घटनेत सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
अज्ञात व्यक्ती चोरीच्या उद्देशाने सैफ राहत असलेल्या इमारतीत शिरल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेनंतर मनोरंजन क्षेत्राबरोबरच राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच आता या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे.
सैफवर झालेल्या हल्ल्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “मुंबईतील कायदा सुव्यवस्था किती ढासळत आहे याचे हे लक्षण आहे. मध्यंतरी याच भागात एकाची हत्या (Murder) झाली आणि हा आता दुसरा हत्येचा प्रयत्न करण्यात आला. या घडत असलेल्या सर्व गोष्टी चिंताजनक आहेत. राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघितले पाहिजे कारण गृहखाते त्यांच्याकडे आहे”, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवत निशाणा साधला.
कसा झाला सैफवर हल्ला?
हल्लेखोर हा अभिनेता सैफ अली खानच्या घरात रात्री दोन वाजताच्या सुमारास घुसला. सुरुवातीला तो लहान मुलांच्या खोलीत गेला. तिथे घरकाम करणाऱ्या महिलेसोबत त्याची बाचाबाची झाली. आवाज ऐकून सैफ तिथे गेला आणि त्याने हटकताच दोघांमध्येही जोरदार वादावादी झाली. त्यानंतर झटापटीत चोराने सैफ आणि मोलकरणीवर चाकूने वार केले. सहा वेळा वार झाल्यामुळे हल्ल्यात सैफ अली गंभीर जखमी झाला. तर मोलकरणीलाही दुखापत झाली आहे. मात्र या हल्ल्याचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.