बारामती | Baramati
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र या शपथविधी सोहळ्यापासुन शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दुर ठेवण्यात आल्याचे चित्र आहे. सुनेत्रा पवार शुक्रवारी सायंकाळी उशिरा त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्विकारण्यास होकार कळवला. त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. पवार कुटुंब देखील तातडीने मुंबईला रवाना झाले आहे. रात्री उशिरा सुनेत्रा पवार आपली दोन्ही मुले पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासमवेत देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्या. आज सायंकाळी पाच वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
या शपथविधी सोहळ्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री बनणार असल्याबाबत आपल्याला काहीच माहित नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. शरद पवार यांनी शनिवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी विषयी ते म्हणाले, हा निर्णय मंत्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अंतर्गत चर्चा करून घेतला असावा. तो त्यांचा पक्षांतर्गत निर्णय असेल. याबाबत माझ्याशी चर्चा झाली नाही. या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुंबईत बैठक घेतली, याबद्दलही आपल्याला काहीच माहीत नाही, असेही शरद पवार यांनी म्हटले. पवारांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार पुढे म्हणाले, मी सकाळी वाचले, असे म्हणाले. अजित पक्षाची जबाबदारी सांभाळत होते, ते गेले आता कुणीतरी पुढे यायला पाहिजे. त्याच्यातून पक्षाने निर्णय घेतला. पक्ष त्यांचा आहे, त्यांच्या पक्षाने जे काही ठरवले त्याची प्रचीती दिसत आहे. आमचा मार्ग वेगळा आहे. परिवार हा साथ देण्यासाठी बाकी राजकारण वेगळे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
अजित पवार गेली अनेक वर्षे संघटनेचे काम करत होते. अजित सामान्यांशी सुसंवाद ठेवून काम करणारा कर्तृत्वान नेता होता, असे शरद पवारांनी सांगितले. अजित पवारांना लोकांच्या प्रश्नांची सखोल माहिती होती. लोकांना न्याय देण्याचे काम अजित करत होता. दैनंदिन कामाची सुरुवात पहाटेच व्हायची. आज हयात असते तर घरी दिसले नसते, फिल्डवर असते, असे शरद पवार म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




