पुणे | Pune
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर गेल्या काही दिवसांपासून ते आपल्या बारामती, मुंबई आणि पुण्यातील घरी दौरे करत होते. तसेच, राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी, त्यांचे सांत्वन करण्यासाठी येत. दरम्यान, आज शरद पवार यांना खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांना अस्वस्थ वाटत होते. त्यांना खोकल्याचा त्रास सुरु होता. आज बारामतीमध्ये असतानाच त्यांना त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने पुण्यात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची प्रकृती बरी नाही. दोन ते तीन महिन्यांपासून अनेक सार्वजनिक कार्यक्रमही त्यांनी टाळले. परंतु अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांनी पुन्हा जनतेच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली. गेल्या आठवड्यातील तीन दिवस ते अजित पवार यांचे निवासस्थान असलेले सहयोग सोसायटीमध्ये होते. गत सप्ताहात प्रचंड दगदग झाल्याने तब्येतीवर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
शरद पवार यांना खोकला आणि कफाचा त्रास आहे. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. शरद पवार मास्क लावून वेगळ्या गाडीने पुण्याकडे रवाना झाले आहेत. शरद पवारांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक सकाळपासूनच गोविंदबागेत दाखल झाले होते. सुमारे तासभर तपासणी केल्यानंतर त्यांना पुण्याला उपचारासाठी जाण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या.
रुबी हॉल चे डॉक्टर ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही वेळात शरद पवार यांना आम्ही तपासून घेऊ. त्यांच्यावर काय उपचार करायचे आहेत ते ठरवले जाईल आणि जर गरज वाटली तर त्यांना ऍडमिट केले जाईल. परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ. असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.





