पुणे | Pune
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांना आपल्या पक्षाने पूर्ण पाठिंबा दिला. असा परिस्थितीत कोणतेही राजकारण आणणार नाही, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. यावेळी, पवारांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला. आज आमचे पाकिस्तान, चीन, बांग्लादेश सोबत चांगले संबंध नाहीत. बांग्लादेशसाठी भारताने त्याग केला, तो बांग्लादेश देखील आपल्यासोबत नाही, असे पवारांनी म्हटले.
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ६ – ७ मे २०२५ च्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर हल्ले करून त्याला प्रत्युत्तर दिले. यावेळी विरोधकांनी एकजूट दाखवत केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा दर्शविला. पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या २६ व्या वर्धापनदिन सोहळ्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हाच मुद्दा मांडला. पहलगामच्या घटनेनंतर आम्ही सरकारवर टीका केली नाही. आपल्या देशाच्या भूमीवर, आपल्या नागरिकांवर हल्ले होत असतील आणि जगाला सामोरे जाण्यासाठी सरकार जी भूमिका घेईल, त्याला आमचे समर्थन असेल असे पवार म्हणाले.
देशात एक काळ असा होता की, जवाहरलाल नेहरु यांचे नेतृत्व आणि भारत हा सगळ्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी ओळखला जायचा. आज आमचे पाकिस्तान, चीन, बांग्लादेश सोबत चांगले संबंध नाहीत. बांग्लादेशसाठी भारताने त्याग केला, तो बांग्लादेश देखील आपल्यासोबत नाही. देशाच नेतृत्व करणाऱ्यांनी सुंसवादाची परिस्थिती जाणीपूर्वक निर्माण केलेली नाही, त्याचा परिणाम देश भोगतोय, दक्षिणेकडील श्रीलंका आपला मित्र आहे की नाही, याबाबत शंका आहे; कारण तोही चीनच्या प्रभावाखाली आहे. त्यामुळे आपला शेजारील देशांशी सुसंवाद आहे, असे म्हणण्याची स्थिती नाही,असे म्हणत शरद पवारांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर टीका केली. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि डावे पक्ष असतील किंवा इतर पक्ष एकत्र येऊन दिल्लीत सुसंवाद निर्माण केला पाहिजे. कोणी आले आणि गेले तरी फरक पडत नाही, आपण एकसंघ राहिलो तर सत्ता येते हा अनुभव आहे, असेही पवारांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




