मुंबई । Mumbai
राज्यात २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकूनही मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपद घेतलं नाही याबद्दल अजित पवार यांनी अनेकदा मनातली खदखद व्यक्त केलीय.
तसंच भुजबळ सिनियर असूनही त्यावेळी त्यांना डावलण्यात आल्याचे आरोपही आता होत आहेत. याच दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
२००४ साली भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही, पण असं नेमकं का करण्यात आलं यामागचं कारण त्यांनी स्पष्ट केलं. २००४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत (तत्कालीन) राष्ट्रवादी कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळूनही मी मुख्यमंत्रिपद कॉंग्रेसकडे दिलं.
तेव्हा ‘सिनिअर’ म्हणून माझ्यापुढे नाव होतं छगन भुजबळांचं. भुजबळांचं नंतरचं राजकारण तुम्ही बघा. त्यांना तुरूंगात जावं लागलं. त्या काळात भुजबळांच्या हातात नेतृत्व दिलं असतं, तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती’, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला आहे.
शरद पवार त्यावेळच्या राजकीय घडामोडींबद्दल बोलताना म्हणाले की, अजित पवार यांचा तेव्हा मुद्दाच नव्हता, आम्ही त्यावेळी अधिक मंत्रीपदं घेतली होती. माझे अनेक तरुण सहकारी मंत्री झाले होते. आर. आर. पाटील, जयंत पाटील, अजित पवार हे तरूण पुन्हा कॅबिनेट मंत्री झाले होते.
नव्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी ते गरजेचं होतं असं शरद पवार म्हणाले. तसंच विलासराव देशमुख हे काँग्रेसी विचारांचे होते, त्यामुळे ते काँग्रेसचे असले, तरी ते मुख्यमंत्री झाले हे योग्यच झालं असं शरद पवार म्हणालेत.