Friday, November 22, 2024
Homeनगरशेअर ट्रेडिंगमध्ये डॉक्टरने घातले 47 लाख

शेअर ट्रेडिंगमध्ये डॉक्टरने घातले 47 लाख

अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष || सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका डॉक्टरची 47 लाख तीन हजार 543 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. विजय नामदेव गाडे (वय 42 रा. नंदनवन कॉलनी, एकविरा चौक, पाईपलाईन रस्ता, सावेडी) असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी सोमवारी (29 जुलै) येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी आयसी ग्रुप गोल्ड स्टॉक क्लब ए 5 या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील अनिका शर्मा नामक महिलेविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 319 (2), 318 (4) सह आयटी अ‍ॅक्ट कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. डॉ. गाडे यांचे नेवासा फाटा येथे हॉस्पिटल असून ते कुटुंबासह नगरमध्ये राहतात. ते 19 जून 2024 रोजी फेसबुकवर शेअर ट्रेडींग कसे करावे व शेअर ट्रेडिंगमध्ये नफा कसा मिळवायचा याबाबत जाहिरात पाहत असताना सदर जाहिरातीवर क्लिक केले असता एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आली व त्यावर त्यांनी क्लिक केले असता त्यांचा नंबर आयसी ग्रुप गोल्ड स्टॉक क्लब ए 5 या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये समाविष्ठ झाला. त्या ग्रुपचे अ‍ॅडमिन अनिका शर्मा हिने तिच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून डॉ. गाडे यांच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर संपर्क करून ट्रेडींग बाबत माहिती दिली. आम्ही सांगेल त्या पध्दतीने गुंतवणूक करा, तुम्हाला अधिक परतावा मिळेल असे सांगून तिने डॉ. गाडे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिने सांगितल्याप्रमाणे डॉ. गाडे यांनी त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून 19 जून 2024 ते 9 जुलै 2024 पर्यंत 39 लाख तीन हजार 543 रुपयांची रक्कम भरली.

दरम्यान, त्यानंतर डॉ. गाडे यांनी अनिका शर्मा हिला गुंतवणूक केलेल्या रक्कमेचा परतावा मिळण्यासाठी विचारणा केली असता तिने सांगितले की, ‘आयपीओ’मध्ये तुम्हाला लॉटरी लागली आहे. तुम्ही अधिक पैशाची गुंतवणूक केली असता तुम्हाला 150 ते 160 टक्के अधिक परतावा मिळेल. तिने सांगितल्याप्रमाणे डॉ. गाडे यांनी 11 जुलै 2024 रोजी त्यांच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यातून आठ लाख रुपयांची रक्कम आरटीजीएसव्दारे पाठविली. त्यानंतर डॉ.गाडे यांनी अनिका शर्मा हिच्याकडे वेळोवेळी पैशाची मागणी केली असता तुम्ही आणखी 40 लाख रुपयांची रक्कम भरा नाही तर तुमचे अकाऊंट फ्रिज होईल व तुम्हाला पैसे परत मिळणार नाहीत, असे सांगितले. डॉ. गाडे यांनी वेळोवेळी पैशाची मागणी केली असता अनिका शर्मा हिने पैसे परत केले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे डॉ.गाडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास प्रभारी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या