अहिल्यानगर (प्रतिनिधी)
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दर महिन्याला 12 ते 15 टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून राहुरी येथील एक व भिंगार मधील दोघे अशी तिघा नागरिकांची तब्बल 20 लाख 40 हजार रूपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विशेष जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार कोतवाली पोलिसांनी 11 जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
तानसेन सुरेश बिवाल (वय 37, रा. राहुरी), मनीष दीपक सोलंकी (वय 35) आणि कविता दीपक सोलंकी (वय 52, दोघे रा. कॅन्टोमेंट चाळ, भिंगार) असे फसवणूक झालेल्या नागरिकांची नावे असून त्यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ऋषिकेश दत्तात्रय तोरडमल, दत्तात्रय नरहरी तोरडमल, मनिषा दत्तात्रय तोरडमल, प्रतीक्षा दत्तात्रय तोरडमल (सर्व रा. माधवबाग, भिंगार), कोमल गणेश क्षीरसागर, गणेश क्षीरसागर (दोघे रा. बालमटाकळी, ता. शेवगाव), वृषाली सचिन भालेराव, सचिन भालेराव (दोघे रा. आलमगीर, भिंगार), प्रतिक गुरव (रा. पाथर्डी), किरण तोरडमल (रा. बारादरी, ता. अहिल्यानगर) आणि सागर तोरडमल (विमाननगर, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
फिर्यादींनी ‘गोल्डन गेट फिन्सर्व’ तसेच ‘आर.एस.ग्रुप ऑफ बिझनेस’ या नावाने काम करणार्या गटांवर शेअर मार्केट गुंतवणुकीसंबंधी विश्वास ठेवून पैसे गुंतवले होते. गुंतवणूक केल्यास दरमहा 12 ते 15 टक्के परतावा मिळेल, असा प्रस्ताव या गटाच्या प्रतिनिधींनी मांडला होता. त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून फिर्यादींनी 26 मार्च 2025 नंतर वेगवेगळ्या टप्प्यांत मिळून तब्बल 20 लाख 40 हजार रूपये जमा केले.
सुरूवातीला काही प्रमाणात परतावा दिल्यानंतर काही दिवसांतच देणे बंद करण्यात आले. गुंतवणूकदारांनी परताव्याबाबत आणि मूळ रकमेबाबत विचारणा केली असता संबंधित प्रतिनिधींनी टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. यातील काही संशयित आरोपी अचानक पसार झाल्याची माहिती मिळाली. परतावा न मिळाल्याने फसवणुकीची खात्री झाल्यावर तिघांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, तक्रार असूनही गुन्हा नोंदवला न गेल्याने गुंतवणूकदारांनी न्यायालयाची मदत घेतली.
याबाबतची खासगी फिर्याद विशेष जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली. न्यायाधीश महेश लोणे यांनी दोन्ही बाजूंची बाजू ऐकून कोतवाली पोलिसांना तातडीने गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्याचे आदेश दिले. गुंतवणूकदारांच्या वतीने अॅड. शुभम साके यांनी न्यायालयात बाजू मांडली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.




