अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या शेअर मार्केट फसवणूक प्रकरणाच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी साईनाथ कल्याण कवडे याला मदत करणार्या तिघा जणांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अपहार करण्यात आलेली रक्कम ऍसिटिक सोल्युशन्स या फर्ममधील कर्मचार्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर झाल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
राजेश एकनाथ काळे, जालिंदर बाळासाहेब काळे, शरद अंकुश काळे (सर्व रा. कुरूडगाव, ता. शेवगाव) अशी अटक केलेल्या तिघा संशयित आरोपींची नावे असून त्यांना गुरूवारी (20 नोव्हेंबर) न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची (24 नोव्हेंबरपर्यंत) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे तिघेही ऍसिटिक सोल्युशन्स फर्ममध्ये कार्यरत असून, त्यांच्या खात्यातून अपहार झालेल्या रकमा ट्रॉन्सफर झाल्याचे खात्रीशीर पुरावे तपास पथकाने गोळा केले आहेत.
अपहार रक्कम गैरमार्गाने फिरविणे, त्याची विल्हेवाट लावणे तसेच मुख्य आरोपीस गुन्ह्यातून फायदा करून देणे यामध्ये संबंधित कर्मचार्यांचा थेट सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्ह्याच्या तपासात निर्णायक पुरावे समोर आल्यानंतर तिन्ही संशयित आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




