Friday, June 28, 2024
Homeनगरशेअर ट्रेडिंगमध्ये आणखी एकाची 36 लाख 23 हजारांची फसवणूक

शेअर ट्रेडिंगमध्ये आणखी एकाची 36 लाख 23 हजारांची फसवणूक

नगरमध्ये 15 दिवसांतील चौथा गुन्हा दाखल || फसवणुकीची रक्कम झाली सव्वा कोटी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नगरमधील अनेकांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे आणखी एकाची तब्बल 36 लाख 23 हजारांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अशा प्रकारे फसवणुकीचा गेल्या 15 दिवसांतील हा चौथा गुन्हा आहे, तर या दाखल 4 गुन्ह्यातील फसवणूक झालेली रक्कम 1 कोटी 29 लाख 48 हजार एवढी झाली आहे.

याबाबत शहाजी तुकाराम गांगर्डे (वय 35, रा. कोंभळी, ता. कर्जत) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे खाजगी नोकरी करतात. त्यांचा मोबाईल नंबर एल्टास फूड वन टू वन सर्व्हिस नावाच्या एका व्हाटसअप ग्रुपमध्ये सहभागी होता. या ग्रुपच्या अ‍ॅड्मीन असलेल्या व्यक्तीने ग्रुपवर शेअर ट्रेडिंगबाबत माहिती टाकली होती. ती माहिती पाहून फिर्यादी गांगर्डे यांनी त्यांच्याशी संपर्क साधत अधिक माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांच्यात वारंवार संपर्क होत राहिला. त्या ग्रुपच्या अ‍ॅड्मीन असलेल्या व्यक्तीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले.

या अमिषाला बळी पडून फिर्यादी गांगर्डे यांनी त्याला 22 एप्रिल ते 31 मे 2024 या कालावधीत 36 लाख 23 हजारांची रक्कम ऑनलाईन पाठविली. त्यानंतर त्यांना परताव्याबाबत संपर्क साधला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर संपर्कच बंद करत पैसे दिले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शुक्रवारी नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात येवून फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी सदर अज्ञात व्यक्ती विरोधात भादवि. 419, 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक दिनेश आहेर हे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या