Wednesday, July 24, 2024
Homeनाशिकसिन्नर बाजार समितीच्या सभापतीपदी शशी गाडे बिनविरोध

सिन्नर बाजार समितीच्या सभापतीपदी शशी गाडे बिनविरोध

सिन्नर | प्रतिनिधी | Sinner

- Advertisement -

सिन्नर बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (ShivsenaUBT) शशी गाडे यांची आज (दि. २६) रोजी अपेक्षेप्रमाणे बिनविरोध (Unopposed) निवड झाली आहे. राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) यांचे खंदे समर्थक असणारे गाडे व त्यांचे सहकारी संचालक नवनाथ नेहे यांनी आज सकाळी माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Waje) यांच्या संपर्क कार्यालयात अधिकृतपणे शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला.

त्यानंतर या दोघांसह शिवसेनेचे सर्व दहा संचालक एकत्र बाजार समितीकडे (Market Committee) गेले. सेनेच्या सिंधूबाई कोकाटे एकट्याच आपल्या केबीनमध्ये बसून होत्या. राष्ट्रवादीच्या (NCP) संचालकांसमवेत त्या सभागृहात गेल्याने त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याचे स्पष्ट झाले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा नाशिकचे सहाय्यक निबंधक राजीव इप्पर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला प्रारंभ झाला होता. त्यानंतर निर्धारीत वेळेत सभापती पदासाठी सेनेचे गाडे व राष्ट्रवादीचे संजय खैरनार यांनी अर्ज दाखल केले.

गाडे यांच्या अर्जावर सूचक म्हणून शरद थोरात यांनी तर अनुमोदक म्हणून जालिंदर थोरात यांनी सही केली होती.खैरनार यांच्या अर्जावर सूचक म्हणून विनायक घुमरे यांनी तर अनुमोदक म्हणून रवींद्र शिंदे यांनी सही केली होती. तसेच दोघांचे अर्ज वैद्य ठरल्यानंतर माघारीसाठी दिलेल्या वेळेत खैरनार यांनी माघार घेतल्याने गाडे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा इप्पर यांनी केली. निवडीची घोषणा होताच सभागृहासह सभागृहाबाहेर उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी घोषणा देत आपला आनंद व्यक्त केला.

Nashik News : नाशिक विभागाला मद्यविक्रीतून मिळाला ‘इतक्या’ हजार काेटींचा महसूल

दरम्यान, सभागृहाबाहेर जिल्हा परिषदेचे माजी सभापती ॲड. राजेंद्र चव्हाणके, राजेश नवाळे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, उदय सांगळे, माजी सभापती अरुण वाघ, डॉ. रवींद्र पवार, बाळासाहेब वाघ, भारत कोकाटे, राजेश गडाख, ॲड. शरद चतुर, आप्पा पवार, सेनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गाडे, शहर प्रमुख गौरव घरटे, राजेश भाबड, विनायकराव शेळके, बाळासाहेब चकोर, बाळासाहेब गाडे, रामनाथ पावसे, युगेन क्षत्रिय, बाळासाहेब कमानकर यांच्यासह दोन्ही गटाचे समर्थक, मळ हद्दीतील कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते.

त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्व संचालक एक एक करत सभागृहाच्या बाहेर पडले. तर उपसभापती कोकाटे आपल्या केबिनमध्ये जाऊन बसल्या. यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे आगमन होताच त्या केबिनमधून एकट्याच सरळ बाहेर निघून गेल्या. त्यामुळे त्यांनी सेनेची पाठराखण केली नाही हे अधोरेखित झाले. त्यानंतर राजाभाऊ यांच्या हस्ते गाडे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ढोल ताशा व फटाक्यांच्या आतषबाजीत शिवसैनिकांनी आपला आनंद व्यक्त करीत गाडे यांची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढली. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) चौकात गाडे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर राजाभाऊ वाजे यांच्या संपर्क कार्यालयात विजयी सभेने मिरवणुकीचा समारोप झाला.

Mitkari vs Awhad : मिटकरींनी दिलेलं चॅलेंज आव्हाडांनी स्वीकारलं; ‘तुतारी’ वाजवली, पण चेक लिहितांना झाला गोंधळ

शेतकरी हिताला प्राधान्य

आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल गाडे यांनी राजाभाऊ यांच्यासह सर्वांचे आभार मानले. यापुढच्या काळात शेतकरी हिताचेच काम आपल्याकडून होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. लिलाव ठरलेल्या वेळेलाच होतील. त्याबाबतीत कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

सेनेकडे दहा संख्याबळ

बाजार समितीच्या सभागृहातील सतरा पैकी दहा संचालक शिवसेनेकडे असल्याचे या निवडणुकीने स्पष्ट झाले. उपसभापती कोकाटे यांनी सेनेऐवजी राष्ट्रवादीची पाठराखण केल्याचे स्पष्ट झाल्याने लवकरच त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाला तर आश्चर्य वाटायला नको.

- Advertisment -

ताज्या बातम्या