मुंबई । Mumbai
गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेषतः, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानांवरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली आहे. मंगळवारी (29 जुलै) झालेल्या महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांना समज दिल्याचे समजते. मात्र, यानंतरही विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. “मुख्यमंत्री विधानभवनात रमी खेळत नव्हते, असा दावा करतात. मग त्यांनी माफी का मागितली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिंदे यांनी पुढे सांगितले की, “मुख्यमंत्री हतबल झाले आहेत. मंत्र्यांना ‘काहीही करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ असा संदेश दिला जात आहे. अजित पवार यांनी यापूर्वीही कोकाटे यांना इशारा दिला, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. मंत्र्यांवर आरोप होऊनही कारवाई न झाल्यास त्यांना भीती वाटणार नाही.”
शिंदे यांनी महायुतीच्या अंतर्गत वादावरही बोट ठेवले. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचा राजीनामा होत नसल्याने राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचाही राजीनामा रखडला आहे. कोकाटे यांचे पुनर्वसन करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आम्ही त्यांचा राजीनामा होईपर्यंत माघार घेणार नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच, महाविकास आघाडी लवकरच आंदोलनाची रणनीती आखणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
लाडकी बहीण योजनेवरूनही शिंदे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. “विधानसभा अधिवेशनात पैसे वाटपाची वसुली न करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे म्हणजे सरकारी पैशांवर डल्ला मारण्यासारखे आहे. निवडणुकीच्या वेळी मते मिळवण्यासाठी कारवाई टाळली आणि आता कारवाईचा दिखावा केला जात आहे,” असे त्यांनी म्हटले.




