पुणे | Pune
बंगळुरूमध्ये आपल्या पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची बातमी, दुसरीकडे उपजिल्हाधिकारी पतीचा काटा काढण्याचा कट रचल्याची बातमी ताजी असतानाचा दौंड तालुक्यातूनही खळबळजनक बातमी समोर आली आहे. होणारा नवरा पसंत नसल्याने त्याला भावी पत्नीनेच थेट जिवे मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मयुरी सुनील दांगडे हिचा विवाह कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील तरुणासोबत होणार होता. मात्र, मयुरीला त्याच्यासोबत लग्न करायचं नसल्याने त्याला जिवे मारण्यासाठी मयुरी दांगडे आणि संदीप गावडे यांनी तब्बल एक लाख 50 हजार रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार यवत पोलिसांच्या तपासात समोर आला आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी मयुरी दांडगे ही सध्या पसार आहे.
याप्रकरणी खुनाचा आदित्य शंकर दांडगे, संदीप दादा गावडे,शिवाजी रामदास जरे,सुरज दिगंबर जाधव आणि इंद्रभान सखाराम कोळपे या 5 जणांना अटक केली. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत. याप्रकरणी, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भावी नवरदेवाला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली होती. कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील असणारा हा युवक हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत होता. दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील खामगाव फाटानजीक यवत पोलिसांच्या हद्दीत एका हॉटेलच्या परिसरात काही जणांनी नवरदेवाला रस्त्यात अडवून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.
त्यामध्ये, त्याला गंभीर दुखापत झाली असून याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 109,352,351 यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता यातील संशयित आरोपी आदित्य शंकर दांगडे (रा.गुघलवडगाव ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर) याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली. त्यामध्ये, आरोपी आदित्यने आपल्या साथीदारांसह हा खून केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतल असून आरोपींनी वापरलेली वेरणा कंपनीची पांढर्या रंगाची चार चाकी कार देखील ताब्यात घेण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेनं तालुक्यात खळबळ उडाली असून लग्न जमलेल्या दोन्ही कुटुंबात शोककळा पसरली आहे.