Friday, November 22, 2024
Homeनगरमेंढपाळाच्या तांड्यातून अल्पवयीन मुलाची सुटका

मेंढपाळाच्या तांड्यातून अल्पवयीन मुलाची सुटका

महिला व बालकल्याण विभागाची कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एका मेंढपाळ तांड्यामध्ये 12 वर्षे वयाच्या मुलाला वेठबिगारासारखे राबविले जात असल्याचे निदर्शनास आल्याने, तसेच हा मुलगा या कुटुंबाचा सदस्य नसून त्यास सालगड्यासारखे ठेवल्याचा संशय असल्याने या मुलास महिला व बालकल्याण विभागाने निरीक्षण गृहात हलविले आहे. पारनेर तालुक्यातील पळशी येथील एक मेंढपाळ कुटुंब नगर शहर परिसरात मेंढ्या चारत आहे.या कुटुंबाच्या तांड्यावर एक 12 वर्षे वयाचा मुलगा नागरिकांना वेठबिगारासारखा काम करताना आढळून आला. याबाबत चाईल्ड लाईन व सहायक कामगार आयुक्त यांना कळविण्यात आले होते.

- Advertisement -

या दोन्ही विभागांनी शुक्रवार व शनिवारी या तांड्यावर जाऊन चौकशी केली असता हा मुलगा आमच्याच परिवारातील असल्याचे उत्तर संबंधित कुटुंबाने दिले. मात्र, महिला बालकल्याण विभागाने अधिक माहिती घेतली असता हा मुलगा या कुटुंबातील नसल्याचा संशय बळावला.त्यामुळे त्यांनी या मुलाला ताब्यात घेऊन निरीक्षणगृहात ठेवले आहे. संबंधित मुलाची सर्व माहिती महिला बालकल्याण विभाग तपासत आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे जिल्हा महिला व बालविकास विभागाकडून सांगितले गेले.

पथकात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, चाईल्ड लाईनचे समन्वयक महेश सूर्यवंशी, आलीम पठाण, राहुल कांबळे, कामगार आयुक्त कार्यालयाचे केदार, भोसले, तोफखाना ठाण्याचे अंमलदार एस. पी. भवर, युवराज गुंड, श्रीकांत भोस आदींचा समावेश होता.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या