देवळाली कॅम्प |वार्ताहर
केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिगद्वारे हिरवा झेंडा दाखवत महाराष्ट्रातील देवळाली ते बिहारमधील दानापूरपर्यंत ‘शेतकरी समृद्धी’ विशेष किसान रेल्वेचा देवळाली रेल्वे स्थानकावरुन शुभारंभ करण्यात आला आहे.
मंगळवार दि 15 रोजी सकाळी 11 वाजता देवळाली रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेच्या डी आर एम इती पांडे, खासदार राजाभाऊ वाजे माजी खासदार हेमंत गोडसे, भाजपाचे जिल्हाप्रमुख सुनील बच्छाव, शेतकी संघाचे जिल्हाप्रमुख सुरज कोकणे, जिल्हा सरचिटणीस शरद कासार तानाजी करंजकर अरुण मोरे सीनियर डीसीएम अजय शाक्य, रतन चावला तानाजी भोर प्रसाद आडके निलेश बंगाली छाया हाबडे आदींसह भाजपचे पदाधिकारी व मध्य रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या रेल्वेचे उद्घाटन करताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पादन वेगाने देशाच्या इतर राज्यात पोहोचवणे हा या रेल्वेचा उद्देश आहे. ही ट्रेन नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, दीनदयाल उपाध्याय यासह अनेक प्रमुख स्थानकांवर थांबणार असून, शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि योग्य भावात त्यांचा माल विकण्याची संधी मिळणार आहे.
देवळाली आणि नाशिक सारख्या भागातून शेतकरी फक्त ₹ 4 प्रति किलो दराने बिहारला त्यांचे उत्पादन पाठवू शकतील. छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांसाठी पार्सल व्हॅनसोबतच या ट्रेनमध्ये सामान्य वर्गाचे डबेही बसवण्यात आले असून, त्यामुळे शेतकरी आणि मजूर दोघांनाही प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. देवलाली ते दानापूर या 1,515 किमी लांब अंतरावर प्रति किलोमीटर मालवाहतूक 28 पैसे प्रति किलोग्रामपेक्षा कमी असेल, ज्यामुळे कमी खर्चात नाशवंत उत्पादनांची वाहतूक करणे शक्य होईल. या ट्रेनमुळे शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ तर मिळेलच पण कामगारांना स्वस्त आणि सोयीस्कर प्रवासाचे साधनही उपलब्ध होईल, ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल. या ट्रेनमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ही विशेष किसान ट्रेन केवळ शेतकऱ्यांचा माल वेळेवर बाजारपेठेत पोहोचवण्यात मदत करेल असे नाही तर कामगार आणि सामान्य लोकांसाठी प्रवासाचा नवा पर्यायही उपलब्ध करून देईल. भारतीय रेल्वे सतत प्रगतीच्या मार्गावर आहे आणि आगामी काळात महाराष्ट्र आणि देशाच्या इतर भागात रेल्वे पायाभूत सुविधा आणि सेवा अधिक मजबूत करण्यासाठी काम करत राहील. या कार्यक्रमात मुंबईहून मध्य रेल्वेचे रेल्वे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग होता.