Friday, January 23, 2026
HomeनगरShevgav : शेवगाव नगरपरिषदेत राजकीय खेळ!

Shevgav : शेवगाव नगरपरिषदेत राजकीय खेळ!

युती तुटली, समित्यांवर भाजप-राष्ट्रवादीच्या दोन गटांचे वर्चस्व

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव नगरपरिषदेत बुधवारी(दि.21) विषय समित्यांच्या सभापती निवडीदरम्यान पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ झाली. उपनगराध्यक्ष निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेली युती काही दिवसांतच तुटली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्यात फाटाफूट झाली आहे. दोन्ही गटांतील काही नगरसेवक आणि भाजप एकत्र आल्याने विषय समित्यांवर त्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. नव्या सत्तासमीकरणाचा प्रारंभ झाला आहे.

- Advertisement -

शेवगाव तहसील कार्यालयात बुधवारी प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्याधिकारी विजया घाडगे व तहसीलदार आकाश दहाडदे यांच्या उपस्थितीत निवडी पार पडल्या. सकाळी 11 वाजता झालेल्या बैठकीत तीन समितीच्या सभापतीपदासाठी प्रत्येकी एक अर्ज आला, तर स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समितीसाठी दिप्ती गांधी व तृषा भारस्कर यांनी अर्ज केला. तृषा भारस्कर यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर सर्व समित्यांच्या सभापतींच्या निवडी प्रांताधिकारी मते यांनी बिनविरोध जाहीर केल्या.

YouTube video player

स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्षा माया अरुण मुंढे, नियोजन आणि विकास समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष सिरोजोद्दीन बापुजी पटेल, सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी कैलास भाऊराव तिजोरे, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी दिप्ती कमलेश गांधी, पाणीपुरवठा आणि जलनि:सारण समितीच्या सभापतीपदी रिजवान छोटुभाई शेख व महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी परविन अमीर शेख यांची बिनविरोध निवड झाली. सर्व विषय समित्यांचे सभापती स्थायी समितीचे सदस्य असतात. यामध्ये सातवा सदस्य म्हणून सागर शशिकांत फडके यांची निवड करण्यात आली आहे.

या बैठकीपूर्वी राजकारणात नव्या समीकरणांनी वेग घेतला होता. विषय समित्यांच्या सभापती निवडीबाबतचे अनेक अंदाज आणि तर्क प्रत्यक्ष निकालात हवेत विरून गेले. उपनगराध्यक्ष निवडीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे 10, शिवसेनेचे 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे 4 असे एकूण 18 नगरसेवक एकत्र आले होते. भाजपमधील मतभेदांमुळे 7 नगरसेवक अलिप्त राहिले होते.

निवडीत भाजपने राजकीय डावपेच बदलत एक समिती आपल्या पदरात पाडून घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसला (शरदचंद्र पवार गट)एक समिती मिळाली. शिवसेना व काही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कोणत्याही समितीत स्थान मिळाले नाही. नव्या समीकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे 6, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे 2 आणि भाजपचे 7 असे एकूण 15 नगरसेवक बहुमताने विषय समित्यांवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाले.

विरोधी पक्षाचा अभाव
या निवडीनंतर नगरपरिषदेत सर्व प्रमुख पक्ष सत्तेत सहभागी झाल्याने विरोधी पक्ष कोण, हा प्रश्न चर्चेचा ठरला आहे. स्पष्ट विरोधी गट नसल्यामुळे पुढील काळात निर्णयप्रक्रिया आणि राजकीय भूमिका कशी राहील, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. एकूणच, शेवगाव नगरपरिषदेत काही दिवसांपूर्वी अस्तित्वात आलेली युती अल्पावधीतच विस्कळीत होत नव्या राजकीय समीकरणांनी आकार घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, पुढील काळात नगरपरिषदेतील निर्णयप्रक्रिया आणि राजकीय समीकरणे कोणत्या दिशेने जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Suicide News : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नवीन घर घेण्यासाठी आणि धंदा टाकण्यासाठी माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून होणार्‍या छळाला कंटाळून बोल्हेगाव उपनगरात राहणार्‍या विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली....