शेवगाव (तालुका प्रतिनिधी)
शेवगाव शहरातील लांडेवस्ती परिसरात शनिवारी दुपारी वीजवाहक तारांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे शेतात उभा असलेला ऊस जळून खाक झाला. या दुर्घटनेत परिसरातील चार शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, अतिवृष्टीमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आणखी एक गंभीर आघात झाला आहे.
घटनेची माहिती अशी की, लांडेवस्ती शिवारातील गट क्रमांक १३८७/१ मध्ये सौ. जयश्री शंकरराव पवार (क्षेत्र ०.६० आर) आणि सौ. मिना अशोक पवार (क्षेत्र ०.६० आर) यांच्या शेतातील उसाला आग लागली. तसेच गट क्रमांक १३८५ मध्ये कल्याण दादासाहेब लांडे (क्षेत्र ०.६० आर) आणि गट क्रमांक १३८७/२ मध्ये विनोद एकनाथ घावटे (क्षेत्र ०.४० आर) यांच्या शेतातील उसालाही आगीचा तडाखा बसला. वीजवाहक तारांमध्ये अचानक झालेल्या स्पार्किंगमुळे शॉर्टसर्किट झाले आणि त्यातून उसाला आग लागल्याचे प्राथमिक समजते.
आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केले. उसाचे पीक पाहता पाण्याची कमतरता आणि हवेत असलेली कोरडी उष्णता यामुळे आग वेगाने पसरली. आसपासच्या शेतकऱ्यांनी पाणी फवारून आणि ‘गावकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न’ केला, मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
घटनेची माहिती मिळताच महावितरणचे लाइनमन अरुण भोसले यांनी घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला. मात्र, नुकसानीचे स्वरूप मोठे असल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडले आहेत. या पिकाची तोडणी काहीच दिवसांत अपेक्षित होती. आता अचानक झालेल्या या आगीमुळे सर्व श्रम, उत्पादन आणि अपेक्षित उत्पन्न धुळीला मिळाले आहे.
अतिवृष्टी, वाढलेले उत्पादन खर्च, कमी दर आणि बोजावलेली कर्जे यामुळे आधीच शेतकरी वर्ग संकटातून जात आहे. त्यातच विद्युत व्यवस्थापनातील त्रुटींमुळे शॉर्टसर्किट होऊन पिके जळण्याच्या घटना वाढत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. “वीजवाहक तारांची वेळोवेळी तपासणी व दुरुस्ती होत नाही. त्याचाच परिणाम म्हणजे अशा घटना. जबाबदार विभागाने गांभीर्याने लक्ष दिले असते तर हे नुकसान टाळता आले असते,” असे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी साखर कारखान्याकडून त्वरित तोडणी करून घेण्याची मागणी केली आहे. तसेच प्रशासनाने पंचनामा करून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. ग्रामीण भागात अशा शॉर्टसर्किटच्या घटना वारंवार होत असल्याने महावितरण विभागाने तातडीने वायरलाइन तपासणी, ढिले खांब दुरुस्ती आणि विद्युत सुरक्षितता यावर भर देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.




