शेवगाव | Shevgav
शेवगाव विधानसभा मतदारसंघात कमळ पुन्हा फुलले, शरद पवार राष्ट्रवादीची तुतारी वाजली पण सर्वत्र आवाज घुमला नाही. तर अपक्ष किटलीचा अर्ध्यावर प्रवास थंडावला. मतदारसंघातील तिरंगी लढतीत भाजप आ. मोनिका राजळे यांनी विजयाची हॅटट्रिक करत आश्चर्याचा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रताप ढाकणे यांचा पराभव केला. अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले पाटील यांना तालुक्यातून अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याने तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यामुळे यंदा शेवगाव-पाथर्डीमध्ये बदल होणार ही केवळ चर्चाच ठरली. मतदारसंघात सुरू असणार्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत आ. राजळे यांनी मतदारसंघावरील पकड कायम ठेवली आहे.
शनिवारी सकाळी 14 टेबलवरुन मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या चार फेर्यांपर्यंत शेवगाव तालुक्यातील काही गावांतील मतदारांनी घुले यांना 8 हजार 944 इतके मताधिक्य दिले. मात्र, 5 व्या फेरीत राजळे यांना 3 हजार 246 तर घुले यांना 2 हजार 986 मते मिळाली. येथून पुढील फेर्यांमध्ये राजळे यांनी थोडी थोडी आघाडी घेत 10 व्या फेरीपर्यंत आघाडीवर असलेले घुले यांच्या पेक्षा 12 व्या फेरीत 5 हजार 231 मतांनी पुढे घेतलेली झेप नंतर उंचावतच राहिली. पाथर्डी व शेवगावने राजळे यांना साथ दिली हे या मतदानाच्या आकडेवारीवरुन सिध्द झाले. मनोज जरांगे फॅक्टर काही प्रमाणात घुले पाटील यांच्या कामी आला. मात्र, मोक्याच्याक्षणी शेवगावकरांनी कच खात घुले यांना सोडून दिले. परिणामी घुले यांच्या मतांचा आकडा वाढला नाही. शेवगाव विधानसभा मतदारसंघात राजळे यांनी तिसर्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यात बाजी मारली आहे. निवडणुकीच्या अगोदर त्यांनी विकास कामांची उद्घाटने करत मतदारसंघ पिंजून काढला व स्वकींयासह विरोधकांचे लक्ष वेधले व यामुळे पुन्हा कमळाचे फूल फुलले.
लाडकी बहिणींच्या लाटेने राजळेंना उचलून धरले. पाथर्डीमध्ये आ. पंकजा मुंडे व प्रितम मुंडे यांचा प्रभाव तर शेवगावमध्ये केंद्रीय नितीन मंत्री गडकरी यांनी घेतलेली सभा, तसेच राजळे यांनी केलेल्या विकास कामांचा जनतेसमोर मांडलेला लेखाजोखा, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मतदारसंघात जोडलेला मोठा जनसंपर्क, भाजपाची फिक्स वोट बँक, राजळे यांची विरोधकांवरील सौम्य शब्दातून टीका व मोठा संयम मतदारांना भावला. यामुळे मतदारांनी राजळेंना मतांचे झुकते माप टाकले असे म्हणावे लागेल. शेवगाव तालुक्यातील नातेवाईकांच्या जाळ्याने राजळेंना अलगद झेलले. तर तालुक्याच्या पूर्वभागात माजी आ. अप्पासाहेब राजळे, स्व. राजीव राजळे यांच्या पुर्वीच्या ऋणानुबंधाने विजयाचे बंध अधिक घट्ट केल्याचे स्पष्ट झाले होते. लढत तशी घासून झाली. लढत घासून होईल असे वातावरण विरोधकांनी सुरुवातीला निर्माण केले. मात्र, ते टिकविण्यातील उणिवांमुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला हार पत्करावी लागली. राजळे यांना पक्षाची उमेदवारी मिळू नये, म्हणून भाजपातील नाराज मंडळींनी मोठी ताकद लावली होती.
मतदारसंघातील विरोधी प्रमुख उमेदवारांनी शेवगाव शहराचा पाणी प्रश्न, रस्ते आदी प्रश्नावर राजळे यांना घेरले. मात्र, अखेर राजळेंनाच उमेदवारी मिळाल्याने त्या सुरुवातीला अर्धी लढाई जिंकल्या तर उर्वरित लढाई त्यांनी पक्षाच्यास प्रभावी वलयामुळे व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर जिंकली. भाजपातील नाराज मंडळीतील काहीजणांनी भाजपाचा प्रचार केला तर काही राष्ट्रवादीकडे वळाले तर काहींनी गनिमी काव्याने राजळे यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात यश आले नाही. या निवडणुकीत विकास कामांपेक्षा जातीयवादाची गणिते मांडली गेली होती. राज्यात महायुतीचे सरकार व राजळे यांची विजयी हॅट्ट्रीक मंत्री पद खेचून आणते काय?याकडे मतदारसंघातील सर्वाचे लक्ष लागले आहे.