Thursday, November 14, 2024
Homeनगरबहुरंगी लढतीत कोण मारणार बाजी !

बहुरंगी लढतीत कोण मारणार बाजी !

शेवगाव तालुक्यात लोकप्रिय आश्वासने देण्याची स्पर्धा

सुनिल आढाव | शेवगाव|Shevgav

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. त्यात महायुती आणि महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी व अपक्ष यांच्यात अनेक लोकप्रिय आश्वासने देण्याची स्पर्धा लागली आहे. यामुळे यंदाच्या बहुरंगी विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

महायुतीच्या आ. मोनिका राजळे, महाविकास आघाडीकडून प्रताप ढाकणे, अपक्ष म्हणून माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील, हर्षदा काकडे, वंचितचे किसन चव्हाण, राष्ट्रीय समाज पक्षाचे आत्माराम कुंडकर, बहुजन समाज पार्टीचे सुभाष साबळे तसेच अपक्ष म्हणून एकनाथ सूसे, सुधाकर चोथे, युनूस चाँद शेख, रत्नाकर जावळे, राजेंद्र ढाकणे, शिवहार काळे, सलमान युसुफ बेग, संदीप शेलार हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात निवडणूक चुरशीची, प्रतिष्ठेची व बहुरंगी बनली आहे. प्रमुख उमेदवार, त्यांचे कुटुंबीय, कार्यकर्ते सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत पदयात्रा, कॉर्नर मिटिंग आयोजित करून मतदारांच्या भेटी घेत आहेत व आमच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन करत आहेत. जाहीर सभांचे आयोजन व त्यातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी आरोप, टीकांचे तोफगोळे डागले जात आहेत.

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचा मोठा भाग दुष्काळी आहे. शेतीच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाईने नागरिक त्रस्त झालेले आहेत. उद्योगधंदे नसल्याने हजारो युवकांच्या हाताला काम नाही. शेती उत्पादनात वाढ झाली की भाव पाडले जातात. सर्व सामान्यांच्या जीवनात स्थैर्य आणण्यासाठी खरे प्रयत्न करणार्‍या लोकप्रतिनिधीच्या शोधात मतदार आहेत. आ. राजळे या त्यांनी केलेल्या रस्ते, वीज, पाणी संदर्भात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडत आहेत. प्रत्येक गावांसाठी काही तरी विकास काम दिल्याचे त्या सांगत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार ढाकणे पिण्याचे पाणी, शेतीसाठीचे पाणी, रोजगार, महागाई या प्रश्नावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगत आहेत.

अपक्ष उमेदवार माजी आ. घुले पाटील यांनी दहा वर्षांपूर्वी केलेल्या कामात काहीच भर पडली नसल्याची खंत व्यक्त करत आहेत. तर शेवगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, ताजनापूर लिफ्ट, नगरपरिषद कामकाजात सुधारणा, रोजगारासाठी एमआयडीसी, तालुक्यातील आरोग्य प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देत आहेत. तर काकडे यांनी वचननामा प्रसिध्द करून दिलेला शब्द पूर्ण करणार असल्याचे वचन मतदारांना देत आहेत. वंचितचे चव्हाण सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांसाठी सदैव हजर राहून ते कसे सोडवतात हे घोंगडी बैठकांच्या माध्यमातून स्पष्ट करत आहेत. उर्वरित उमेदवारही विकासाच्या मुद्यावर मतदारांपर्यंत पोहचत आहेत.

वातावरण निर्मितीसोबत मतदान गरजेचे
मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे व पंकजा मुंडे फॅक्टर किती प्रभावी ठरतात, यावर तालुक्यातील मतदारांच्या चर्चा रंगलेल्या आहेत. तर काहीजण मतांची आकडेमोड करत आपला उमेदवार कसा विजयी होणार याची गणिते मांडताना दिसत आहेत. मात्र, या निवडणुकीत मतदार या जाहीरनाम्यातील आश्वासनांवर आधारित की निवडणूक काळात तयार होणार्‍या हवेवर अवलंबून राहत, मागील काळात आलेले अनुभव लक्षात घेऊन मतदान घडवून आणणार यावर विजयाची दिशा ठरणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या