शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav
तालुक्यात शनिवारी रात्री व रविवारी दिवसभर झालेल्या पावसाने अनेक वर्षांचे उच्चांक मोडत शेतकर्यांचा व सर्वसामान्य नागरिकांचा कणा मोडण्याचे काम केले आहे. शेतातील पिकातून, नद्यांच्या पुलावरून पाणी वाहिले, गावातील घरांमध्ये पाणी घुसले. तालुक्याच्या इतिहासात प्रथमच देवटाकळी येथे पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टर दाखल होतेे. मात्र बचाव कार्यात अडचणी आल्याने ते मागे परतले.
तालुक्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दाणादाण उडवली असून सर्व नद्या-नाल्यांना आलेल्या महापूरामुळे शेती, पिके, घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काल शनिवार दि. 27 रोजी रात्री तालुक्यातील शेवगाव – 121.5, भातकुडगाव व ढोरजळगाव – 109.8, मुंगी – 82.3 तर बोधेगाव, चापडगाव, एरंडगाव व दहिगांव ने – 72.8 या आठही मंडळामध्ये अतिवृष्टी होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाण्याची आवक वाढल्याने जायकवाडी धरणामधून 1 लाख 98 हजार 072 क्युसेकने गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. मुंगी गावाला अतिदक्षतेचा इशारा दिला असून प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे तालुक्यात धडकी भरवणारा पाऊस पडत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.
गेल्या दहा दिवसांत तिसर्यांदा अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे तालुक्यातील ढोरा, नांदणी, चांदणी, वटफळी, सकुळा, रेडी, सूर्यकांता, खडकळी, काशी आदी नद्यांना अनेक वर्षांनंतर चार ते पाच वेळा महापूर आला आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून रहिवासी भागातील शेतीचे, वस्त्यांचे व रस्त्यांचे प्रचंड नुकसान केले. यामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर पीक क्षेत्र बाधित झाले आहे. शनिवारी रात्री पुन्हा पावसाने तालुक्यात संततधार झाल्याने अगोदरच नदीपात्रे व पीकांतून वाहत असलेल्या पाण्यात भर घालून नुकसानीचा विस्तार वाढवला आहे. आठही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून त्यात शेवगाव – 121.5, भातकुडगाव व ढोरजळगाव – 109.8 मिमी पाऊस पडला.
यामुळे ढोरा, डोमेश्वर नाला, रेड्डी या नद्यांना पुन्हा महापूर आला. या पुरामुळे प्रथमच ढोरजळगाव, आपेगाव, आखातवाडे, मळेगाव, सामनगाव, लोळेगाव येथील नदीकाठच्या वस्त्यांसह परिसरातील अनेक वस्त्यांना पाण्याने वेढा दिला. आखातवाडे येथे उगले व कातकडे वस्ती, सामनगाव येथे जाधव, कापरे, देवढे, नजन, घोरपडे, घुगरे, दारकुंडे व सातपुते वस्तीला पाण्याने वेढा दिला. या वस्त्यांवरील नागरिकांना त्वरीत स्थलांतरित करण्यात आले. भातकुडगाव येथील शिव व कार्तिकी तर देवटाकळी येथील रेड्डी नदीला आलेल्या पुरामुळे देवटाकळी येथील सावंत, मुळे, कर्डीले, खरड, भवार, भोईटे, कंठाळे, वाघमारे, काळे, दळे, मेरड, थोटे या वस्त्यांना पाण्याने वेढा दिल्याने 250 हून अधिक ग्रामस्थ अडकून पडले होते. तेथील ग्रामस्थांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले.
तर दहिगांवने रस्त्यावरील संतोष खरड व वसंत मिर्झे यांच्या वस्त्याला पाण्याने वेढा दिला. मिरझे यांच्या कुटुंबाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने हेलिकॉप्टरची व्यवस्था केली; मात्र तेथे अडचणी आल्याने ते मागे परतले. त्यामुळे तेथील ग्रामस्थांनी मिरझे यांच्या कुटुंबाला चपुच्या सहाय्याने तर खरड यांच्या कुटुंबाला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले. कार्तिकी नदीला आलेल्या पुरात शेवगाव-नेवासा रस्त्यावरील गुंफा येथील पुलाच्या पाण्यातून घातलेले चारचाकी वाहन मध्येच अडकले. वाहनातील युवकांना वाहनाच्या छतावर सहारा घेण्याची वेळ आली. शेवटी, तेथे उपस्थित असलेल्या युवकांनी त्यांना पाण्याबाहेर काढले.
रविवारी ढोरा नदीला महापूर आल्याने ढोरजळगाव, आपेगाव, आखतवाडे, मळेगाव, सामनगाव येथील तर डोमेश्वर नाल्याला पाणी आल्याने नगर रस्ता तसेच जोहरापूर, भायगाव, देवटाकळी व शेवगाव येथील सुर्यकांता नदीला पूर आल्याने पैठण रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पूर्व भागामध्ये चापडगाव, हातगाव, बोधेगाव, ठाकुर पिंपळगाव येथील नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तालुक्यातील मुंगी गावाला अतिदक्षतेचा इशारा दिल्याने तहसीलदार आकाश दहाडदे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सावधानतेचा इशारा दिला. निरीक्षक मुटकुळे यांनी स्वतः मुंगी येथे जाऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या कामाची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या.
अतिवृष्टीमुळे नदयाकाठच्या वस्त्यांना मोठा फटका बसला. गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक वस्त्यांवरील वीज गायब आहे. अन्न व पिण्याच्या पाण्यासाठी अनेकांचे हाल होत आहेत. जनावरांच्या चा-याचा ही प्रश्न बिकट झाला आहे. गावातील नातेवाईक व ग्रामस्थ या पूरग्रस्तांना मदत करीत आहेत. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी प्रशासन अधिक कार्यक्षम होण्याची मागणी पूरग्रस्त करीत आहेत.




