बोधगाव, शेवगाव |प्रतिनिधी| Shevgav
शेवगाव पोलिसांनी मुंगी गावाच्या शिवारातील एका शेतावर छापा (Police Raid) टाकून 8 लाख 96 हजार 200 रुपये किंमतीचा गांजा जप्त (Cannabis Seized) केला आहे. याप्रकरणी एकास अटक (Arrested) करण्यात आले आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कोंबिंग ऑपरेशन राबवून अंमली पदार्थ, अवैध धंदे, अग्निशस्त्रे व हत्यारे कारवाई याबाबत मोहीम तालुक्यात राबवण्यात येत आहे. यामध्ये मुंगी गावाच्या शिवारातील शेतात लावलेली गांजाची झाडे शेवगाव पोलिसांनी (Shevgav Police) ताब्यात घेऊन 8 लाख 96 हजार रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांना गुप्त बातमीदारामार्फत मुंगी गावच्या शिवारात एका व्यक्तीच्या शेतामध्ये गांजाची झाडे (Cannabis) असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या अनुषंगाने भदाणे यांनी तात्काळ तपासासाठी पोलीस पथक रवाना केले. संशयित आरोपी मुकुंद विनायक होळकर (रा. मुंगी ता. शेवगाव, जि. अहमदनगर) यास पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेऊन सदर गांजाच्या झाडांबाबत चौकशी केली असता सदरची झाडे ही त्यांच्या मालकीच्या शेत गट नं. 85 मध्ये शेतात लागवड केलेली असल्याची कबुली दिली. पोलीस पथक व शासकीय पंचासमक्ष आरोपीने त्याच्या शेतातील गांजाची झाडे दाखविली.
गांजाची 94 लहान मोठी हिरवी झाडे व 3 सुकलेली अशी 97 झाडे ताब्यात घेऊन त्याचे दोन पंचांसमक्ष वजन करून ताब्यात घेण्यात आले. त्याचे एकूण वजन 179 किलो 24 ग्रॅम भरले. 5 हजार रुपये प्रति किलो प्रमाणे त्याची एकूण किंमत 8 लाख 96 हजार 200 रुपये आहे. ही झाडे जप्त करून शेवगाव पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आली आहेत.
पोलीस कॉन्स्टेबल शाम गुंजाळ यांच्या फिर्यादीवरुन एनडीपी एस कायदा सन-1985 चे कलम 20 (ब) प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करत आहेत.
सदरची कारवाई उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. दिगंबर भदाणे, पोसई अमोल पवार, सफौ राजु ससाणे, पोहेका किशोर काळे, पोना उमेश गायकवाड, संदिप आव्हाड, पो. कॅा. बाप्पासाहेब धाकतोडे, शाम गुंजाळ, अमोल ढाळे, एकनाथ गर्कळ, संतोष वाघ, चापोहेकाँ बडे यांनी केली.