Saturday, January 24, 2026
Homeनगरशेवगाव तालुका वार्तापत्र : आतापासून काटे की टक्करचे संकेत

शेवगाव तालुका वार्तापत्र : आतापासून काटे की टक्करचे संकेत

सेना उबाठा गटाची नेत्यांकडे नजर

शेवगाव | सुनील आढाव

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका तातडीने घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणूकसाठी शेवगाव तालुक्यातील दुसर्‍या फळीतील नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या निवडणुका महायुती सरकारमधील पक्ष एकत्रित लढवतात की स्वतंत्र यावर गट व गणातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, तालुक्यात महायुतीच्या प्रमुख पक्ष भाजपमध्ये दुहीचे राजकारण असल्याने व काही नेते पक्ष बदल करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे यंदा तालुक्यात काटे की टक्कर होणार असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

मतदारसंघाच्या आमदार भाजपच्या मोनिका राजळे असल्या तरी, शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या घुले परिवाराचेच वर्चस्व आहे. शेवगाव पंचायत समिती व शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गटांतही यापूर्वी घुले परिवाराचेच वजन राहिले आहे. गेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने म्हणजेच घुले गटाने 4 पैकी 3 गटांत व 8 पैकी 8 पंचायत समिती गणात विजय मिळवला होता. तर लाडजळगाव गटात जनशक्ती मंचच्या हर्षदा काकडे यांनी विजय मिळवला. तालुक्याच्या ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या पंचायत समितीमध्ये दहिगाव-ने, एरंडगाव, मुंगी, बोधेगाव, लाडजळगाव, खरडगाव, भातकुडगाव, अमरापूर अशा आठ गणातून सर्व आठ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले. त्यामुळे माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला, तर उपसभापतिपद शिवाजी नेमाणे, नूतन भोगळे यांनी अडीच-अडीच वर्षे उपभोगले. यावेळीही शेवगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या घुले-राजळे यांच्यातच रंगणार आहेत.

YouTube video player

मागील जि. प. निवडणूकीत आ. मोनिका राजळे यांच्या भाजपला या तालुक्यात खातेही उघडता आले नव्हते. यावेळी त्यांनी विधानसभेची हॅट्रीक केली असून त्या शेवगाव पंचायत समिती जिंकण्याकडे लक्ष देणार असल्याचे दिसत आहे. त्या दृष्टीने शेवगाव तालुक्यात भाजपची ताकद वाढविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेवगाव पंचायत समिती ताब्यात घेण्याची व्यूव्हरचना भाजपचे कार्यकर्ते बांधताना दिसत आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक चांगलीच काट्याची होणार आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे डोळ्यासमोर ठेऊन घुले बंधूंनी शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत पदाधिकारी खांदेपालट केली. शेवगाव बाजार समितीही माजी आमदार चंद्रशेखर घुले व नरेंद्र घुले यांच्याच ताब्यात आहे. तेथे सभापती म्हणून एकनाथ कसाळ व उपसभापति म्हणून गणेश खंबरे यांच्या जागेवर शेवगावच्या पूर्व भागातील नानासाहेब मडके यांची सभापतीपदी तर उपसभापतीपदी शेवगाव पश्चिमेच्या रागिणी लांडे यांची निवड केली आहे.

घुले हे सध्या अजित पवार गटासोबत आहेत. त्यामुळे महायुतीत असले तरी घुले विरुद्ध राजळे लढत होण्याची दाट शक्यता आहे. आमदार राजळे शेवगाव पंचायत समितीत उमेदवार विजयी करुन एंट्री करतात काय? शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापराव पवार काय भुमिका घेतात? हे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच काकडेंचा जनशक्ती विचार मंच कोणासाठी धोकादायक ठरेल? हे हळूहळू स्पष्ट होईल. शेवगाव तालुक्याच्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत यावेळी जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे दोन गट वाढले आहेत. आता जिल्हा परिषदेचे 5 गट व पंचायत समितीचे 10 गण झाले आहेत. शेवगाव तालुक्यात एक गट व दोन गण वाढल्याने चांगलीच तोडफोड झाली.

जिल्हा परिषद निवडणुकीचा विचार केला तर, दहिगावने, भातकुडगाव, बोधेगाव गट कायम राहिले. परंतु त्यांच्या गणात मात्र बदल झाला. या पुनर्रचनेत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले, बोधेगाव गटाच्या सदस्या संगीता दुसुंगे, भातकुडगाव गटाचे सदस्य रामभाऊ साळवे यांचे गट कामय राहिले. हर्षदा काकडे यांचा लाडजळगाव गट वगळून तो गण करण्यात आला. त्यामुळे त्यांना इतर गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे. आता इतर गणातून पाच महिलांना संधी मिळणार आहे.

  • जिल्हा परिषद गटाचे आरक्षण 1) दहिगाव ने (इतर मागास वर्ग) 2) बोधेगाव (इतर मागास वर्ग) 3) मुंगी (इतर मागास वर्ग महिला) 4) भातकुडगाव (इतर मागास वर्ग महिला) 5) अमरापूर (अनुसूचित जाती).
  • पंचायत समितीचे गणाचे आरक्षण 1) दहिगाव गण- सर्वसाधारण महिला 2) एरंडगाव गण- सर्वसाधारण महिला 3) चापडगाव गण- सर्वसाधारण 4) मुंगी गण- सर्वसाधारण 5) बोधेगाव गण- सर्वसाधारण महिला 6) लाडजळगाव गण- सर्वसाधारण महिला 7) भातकुडगाव गण- सर्वसाधारण 8) वाघोली गण- अनुसूचित जाती 9) अमरापूर गण- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 10) आखेगाव गण- नागरिकांचा मागास प्रवर्ग.

 

ताज्या बातम्या

Nashik BJP Politics : महापौर पदासाठी भाजप खेळणार ‘हा’ मोठा डाव;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापौरपदासाठी (Mayor Post) भाजपकडून (BJP) धक्कातंत्र वापरले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. पारंपरिक आणि सध्या विविध निकषांवर चर्चिल्या जाणाऱ्या...