Wednesday, July 24, 2024
Homeनगरशिबलापूर येथे भर दिवसा धाडसी चोरी

शिबलापूर येथे भर दिवसा धाडसी चोरी

आश्वी |वार्ताहर| Ashwi

- Advertisement -

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर शिवारात सोमवारी भर दुपारी धाडसी चोरी झाली. संगीता भीमराज सांगळे यांच्या बंद घराची कडी उघडून 4 लाख 60 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संगीता सांगळे यांचे शिबलापूर शिवारातील गट नंबर 127 मध्ये राहते घर व शेती आहे. सोमवारी दुपारी घराला कडी लावून घरासमोरील लिंबाच्या बागेत लिंब गोळा करण्यासाठी त्या गेल्या होत्या. 1 वाजेच्या सुमारास त्या घरी आल्या असता घराचा दरवाजा त्यांना उघडा दिसला. त्यामुळे त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता घरातील सामानाची उचकापाचक केल्याचे दिसून आले. त्यामुळे संगीता सांगळे यांनी घराशेजारी राहत असलेल्या नागरिकांना बोलावून घेत या घटनेची माहिती देऊन घरातून काय काय चोरीला गेले यांचा शोध घेतला.

यावेळी घरातील लोखंडी कपाटातून 80 हजार रुपये किंमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची साखळी, 25 हजार रुपये किंमतीची सात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, 80 हजार रुपये किंमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, 60 हजार रुपये किंमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे कानातले, 20 हजार रुपये किंमतीचे अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे कर्णफुले, 20 हजार रुपये किंमतीचे अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र तसेच 55 हजार रुपये रोख असा एकूण 4 लाख 60 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

याबाबत संगीता सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास आश्वी पोलीस करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या