मुंबई | Mumbai
शरद पवार यांचा आज ८५ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली. या भेटीदरम्यान अजित पवार यांनी शरद पवारांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.यासोबतच दोघांमध्ये राजकीय विषयावरही चर्चा झाल्याचे खुद्द अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणार असल्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. त्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. भविष्यात काय घडेल काहीच सांगता येत नाही, अशी सूचक प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे.
शरद पवारांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत अजित पवारांनी सहकुटुंब त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भेटीवेळी त्यांच्यासमवेत पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार छगन भुजबळ आदी प्रमुख नेतेमंडळीही उपस्थित होते. दोघांच्या भेटीवेळी नेमकी काय राजकीय चर्चा झाली यावर चर्चा होत आहे. या संदर्भात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी तर्क लावला असून पुढील पाच ते सहा महिन्यात मोठी बातमी सर्वांच्या कानी पडणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे.
काय म्हणाले शिरसाट?
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे. अजित दादा हे शरद पवार यांना भेटल्याने शिवसेनेची कोंडी होणार नाही. ही कौटुंबिक भेट असेल तर ठिक. पण जाणकार म्हणतात की, शरद पवार आणि अजित पवार येत्या काळात एकत्र येतील. चार ते सहा महिन्यांमध्ये तुम्हाला मोठी बातमी मिळेल. शंभर टक्के बनवले ते होऊ शकते. ते काय UBT थोडी आहे ते पवार आहेत. अनेकवेळा त्यांनी काँग्रेस सोडली आणि जॉईन केली. समाजवादी घडली राष्ट्रवादी काढली. ते काहीही करू शकतात. शरद पवार काय करतील ते बाजूवाल्या माणसाला कळत नाही.
ते पुढे असे ही म्हणाले, राजकारण वेगळा भाग आहे काका हा वेगळा भाग आहे. दुरावा निर्माण झाला. पण आता बंद दाराच्या आड काय चर्चा झाली हे केवळ ते दोघे नेते सांगू शकतील. पक्ष उभा करण्यामागे अजित पवार यांचाही तितकाच मोठा सहभाग आहे जितका शरद पवार यांचा आहे. एकत्र आल्यामुळे ताकद वाढू शकेल असे होऊ शकते. ते शरद पवार आहे, कुठला मास्टर स्ट्रोक मारतील हे कळणार नाही, असे ही शिरसाट म्हणालेत.
शरद पवार यांच्याकडे मोठे नेतृत्व गुण आहे. त्यांनी एकखांबी राजकारण फिरवलेय. पण शरद पवार कळाले नाहीत. चांगल्या कामात आणि वाईट कामात शरद पवारांचा हात असतो. शरद पवारांना आमच्या शुभेच्छा. त्यांनी दीपस्तंभाप्रमाणे काम करावे, असे शिरसाट यांनी सांगितले.