Friday, November 22, 2024
Homeनगरशिर्डी परिसरातील धार्मिक पर्यटन, आर्थिक विकासाला चालना - नरेंद्र मोदी

शिर्डी परिसरातील धार्मिक पर्यटन, आर्थिक विकासाला चालना – नरेंद्र मोदी

शिर्डी विमानतळाच्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Ranjangav Deshmukh

कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. शिर्डी विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीमुळे शिर्डी व परिसरातील धार्मिक पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी केले.

- Advertisement -

शिर्डी विमानतळ येथील कार्यक्रमप्रसंगी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. आशुतोष काळे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आशिष येरेकर, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर, शिर्डी विमानतळ संचालक गौरव उपश्याम उपस्थित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, शिर्डी विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीमुळे साईबाबांच्या भक्तांना सुविधा मिळणार आहेत. यामुळे शिर्डी, शनिशिंगणापूर व आजूबाजूच्या परिसरातील भक्तांच्या संख्येत वाढ होऊन राज्यातील पर्यटन विकासाला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील. कार्गो कॉम्प्लेक्समुळे शिर्डी, लासलगाव, अहिल्यानगर व नाशिक परिसरातील कांदा, द्राक्ष, शेवगा, पेरू व डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांचा कृषी माल देश-विदेशात निर्यात होईल, असेही श्री. मोदी यांनी यावेळी सांगितले.

हरियाणाच्या जनतेने विकास कार्याला साथ दिली आहे. काँग्रेसने फक्त तेथील जनतेला भडकावण्याचे काम केले. शेतकर्‍यांचीही दिशाभूल केली. आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम काँग्रेसने आजपर्यंत केले असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केला. रायगड येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र शासनाचे नेहमीच सहाय्य राहिले आहे. शिर्डीला साईबाबांमुळे आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे. साईबाबा भक्तांच्या सेवेसाठी शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाची नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत साकारत आहे. या इमारतीची अंदाजित किंमत 645 कोटी रुपये आहे. यामुळे शिर्डी परिसरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. आजूबाजूच्या परिसरातील शेतकर्‍यांना फायदा होणार आहे.

नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुविधा सुरू होणार आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीमुळे शिर्डी शहर जगाच्या नकाशावर येणार आहे. येत्या काळात येथे येणार्‍या साईभक्तांमुळे शिर्डी हे भारतातील सर्वांत जास्त प्रवाशांनी गजबजलेले विमानतळ ठरणार आहे. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, शिर्डी विमानतळ हे संपूर्ण जिल्ह्याचे आर्थिक विकासाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपाला येणार आहे. या विमानतळामुळे शिर्डी एमआयडीसीतील उद्योगांना चालना मिळणार आहे. आजपासून शिर्डी विमानतळाचे नाव साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्ट असे करण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या