अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर आणि शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी आज 13 मे (सोमवारी) सकाळी सात ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान होणार आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी निवडणूक यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन सज्ज झाले असून सर्वत्र मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज होणारे मतदान हे शांततापूर्ण वातावरणात व्हावे, यासाठी निवडणूक विभागाचे प्रयत्न असून सायंकाळी सहानंतर 18 व्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रणात बंद होणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार मतदानादरम्यान मतदारांना निवडणूक केंद्रात मोबाईलवर बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, रविवारी सकाळी जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात येणार्या विधानसभा मतदारसंघांच्या मुख्यालयातून प्रचार साहित्य, मतदान यंत्रे यासह अन्य साहित्याचे वाटप करण्यात आले. तालुका पातळीवर असणार्या सहायक मतदान अधिकारी यांच्या देखरेखीत मतदानासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांना साहित्यासह मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आले. यासाठी एसटी महामंडळाच्या बसेससह अन्य शासकीय वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी पाचच्या आत मतदान साहित्यासह मतदान अधिकारी आणि कर्मचारी, पोलीस बंदोबस्त मतदान केंद्रावर पोहच झाला.
जिल्ह्यात लोकसभेसाठी शिर्डी आणि नगर असे दोन मतदारसंघ असून याठिकाणी शिर्डीत 16 लाख 77 हजार 355 तर नगरमध्ये 19 लाख 81 हजार 866 असे एकूण 36 लाख 59 हजार 201 मतदार आहेत. यापैकी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना आणि उपक्रम राबवण्यात आले. या माध्यमातून जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढवण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे दिसून आले. यासह मतदान केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावतीने विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. यात पिण्याचे पाणी, दिव्यांगासाठी रॅम्प, व्हिलचेअर, सुरक्षा व्यवस्था, उष्माघातापासून संरक्षणासाठी औषधे, बैठक व्यवस्था, सावलीसाठी मंडप उभारणी, तसेच पाळणाघर यासह आरोग्य विभाग याठिकाणी दक्ष ठेवण्यात आले आहे. निवडणुकीसाठी 23 जानेवारीला प्रसिध्द झालेल्या जिल्ह्याच्या मतदार यादीत जिल्ह्यात 36 लाख 11 हजार 96 मतदार होते. त्यानंतर पुरवणी यादीत 48 हजार 105 नव्याने मतदार वाढले.
जिल्ह्याच्या एकूण मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या 18 लाख 97 हजार 519 तर पुरूष मतदारांची संख्या 17 लाख 61 हजार 485 आहे. पुरवणी यादीनंतर नगर लोकसभा मतदारसंघासाठी 19 लाख 81 हजार 866 तर शिर्डी लोकसभेसाठी 16 लाख 77 हजार 335 मतदार आहेत. आज होणार्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात शिर्डी लोकसभेसाठी 1 हजार 708 मतदान केंद्र असून ते अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यातील आहेत. तर नगर लोकसभेसाठी 2 हजार 23 मतदान केंद्र असून ते शेवगाव-पाथर्डी, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत- जामखेड तालुक्यात आहेत. 1 हजार 500 पेक्षा अधिक मतदार असणारी नगर शहरात 2 आणि श्रीगोंदा तालुक्यात 1 असे तीन मतदान केंद्र असून या ठिकाणी सहायकारी मतदान केंद्र असणार आहेत. जिल्ह्यात 3 हजार 734 एकूण मतदान केंद्र राहणार आहेत. निवडणुकीतील उमेदवारांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्यात प्रत्येक मतदान केंद्रावर दोन मतदान यंत्र आणि एक कंट्रोल युनिट राहणार आहे. पत्र्याचे छत असलेल्या मतदान केंद्रावरील छतांवर गवताचे पाचट टाकण्यात येणार आहे. वादळी वार्याने हे पाचट उडून जावू नये, यासाठी यांची बांधणी पक्की करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वादळी वारा व पावसाची शक्यता लक्षात घेता वॉटरप्रूफ मंडप उभारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, मतदान प्रक्रिया झाल्यानंतर बंदोबस्तात मतदान यंत्रला नगरच्या एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये जमा करण्यात येणार आहेत.
मतदानाबाबत उत्सुकता शिगेला
राज्यातील अन्य मतदारसंघात यापूर्वी झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेत मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचे दिसून आले होते. नगर जिल्ह्यात देखील असे घडू नयेत, यासाठी प्रशासनासोबत राजकीय पक्षाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. नगर लोकसभा मतदारसंघात गतपंचवार्षिकला 64 टक्के मतदान झाले होते. यंदा हा आकडा 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागाचा प्रयत्न आहे. यासाठी विविध उपाययोजना आणि मतदारामध्ये जनजागृती करण्यात आली आहे. यामुळे यंदा मतदानाचा आकडा वाढणार की तेवढाच राहणार याची उत्सुकता सर्वांना राहणार आहे.
2 हजार 338 मतदान केंद्रावरून वेबकास्टींग
नगर व 38 शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेचे वेबकास्टींग कॅमेर्याद्वारे प्रशासनामार्फत करडी नजर राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी दिली आहे. जिल्ह्यात 2 हजार 334 ठिकाणाहून हे वेबकास्टींग होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने एकूण मतदान केंद्रांच्या 50 टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी होत असलेल्याय मतदानासाठी 3 हजार 734 मतदान केंद्र राहणार आहेत. त्यापैकी नगर लोकसभा मतदारसंघात 2 हजार 26 व शिर्डी लोकसभा मतदारसंघात 1 हजार 708 मतदान केंद्र आहेत. यापैकी नगर मतदारसंघातील 1 हजार 18 मतदान केंद्रांवर तर शिर्डी मतदार संघातील 856 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग कॅमेरे लावण्यात आले आहेत. याशिवाय पाचपेक्षा जास्त मतदान केंद्र एकाच शाळेत किंवा इमारतीत असणार्या नगर मतदारसंघातील 172 मतदान केंद्रांवर व शिर्डी मतदारसंघातील 134 मतदान केंद्रांवरही वेबकॅमेरे लावण्यात आले आहेत. याशिवाय निवडणूक निरीक्षक यांच्या सूचनेनुसार नगर मतदारसंघातील 164 मतदान केंद्रांवर वेब कॅमेराद्वारे नजर ठेवली जाणार आहे. मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे व गोपनीयतेचा भंग न होता मतदानप्रक्रिया पार पाडली जात आहे हे याद्वारे सुनिश्चित केले जाते. तसेच मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उपाययोजना करणे व घडल्यास संबंधिताविरुद्ध योग्य कारवाई करण्यासाठी देखील याचा वापर करण्याबत येणार असल्याचेही सालीमठ यांनी यावेळी स्पष्ट केले.
बंदोबस्तात मतदान यंत्रे नगरला येणार
मतदानाची प्रक्रिया सायंकाळी सहा वाजता संपणार आहे. त्यानंतर मतदान केंद्रांवरून सील करून मतदान यंत्रे आधी त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी आणि त्यानंतर त्याठिकाणी नोंद करून नगरला एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनला जमा करण्यात येणार आहेत. याठिकाणी सशस्त्र पहारा आणि सीसीटीच्या निगराणीत 4 जूनला मतमोजणी होईपर्यंत मतदान झालेले यंत्र कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.