राहाता । तालुका प्रतिनिधी
शिर्डी विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या १२ उमेदवारांपैकी ४ जणांनी माघार घेतल्याने ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचेसह ८ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी अपक्ष उमेद्वारी अर्ज ठेवला आहे.
सोमवारी माघारीचा अंतिम दिवस होता. दुपारी ३ वाजेपर्यंत अपक्ष उमेदवार तुषार गणेश सदाफळ, ममता राजेंद्र पिपाडा, जनार्दन चंद्रभान घोगरे, हिंदू एकता आंदोलनाचे सुदर्शन लक्ष्मण शितोळे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
निवडणूक रिंगणात महायुतीकडून भाजपचे राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील, महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रभावती जनार्धन घोगरे, राजू सदिक शेख (वंचित बहुजन आघाडी), मोहम्मद इसहाक इब्राहिम शाह (भारत जोडो पार्टी), डॉ. पिपाडा राजेंद्र मदनलाल (अपक्ष), मयुर संजय मुर्तडक (अपक्ष), रेश्मा अल्ताफ शेख (अपक्ष), रामनाथ भाऊसाहेब सदाफळ (अपक्ष) असे आठ जण निवडणूक रिंगणात आहेत.
हे ही वाचा : जिल्ह्यातही बंडाचे झेंडे कायम, बहुरंगी लढती
प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी निवडणूक रिंगणातील उमेदवारांना चिन्ह वाटप केले. ना. विखे पाटील यांना कमळ, प्रभावती घोगरे यांना पंजा, राजू शेख यांना गॅस सिलेंडर, मोहम्मद इसहाक इब्राहिम शाह यांना काचेचा पेला, डॉ. पिपाडा यांना ऑटो रिक्षा, मयुर मुर्तडक यांना ट्रॅम्पॅट, रेश्मा अल्ताफ शेख यांना शिवणयंत्र तर रामनाथ सदाफळ यांना रोडरोलर हे चिन्ह मिळाले आहे.
दरम्यान भाजपाचे ना. राधाकृष्ण विखे पाटील हे आठव्यांदा शिर्डी मतदार संघात उभे आहेत. त्यांची मुख्य लढत महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांच्याशी आहे. पिपाडा यांच्या उमेदवारीचा कोणाला फायदा कोणाला तोटा याची चर्चा आता रंगू लागली आहे.
हे ही वाचा : NOTA साठी श्रीगोंदा व श्रीरामपूरमध्ये स्वतंत्र यंत्रे
ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा शिर्डी विधानसभा मतदार संघ बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात या निवडणुकीच्या निमित्ताने आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत. प्रमुख उमेद्वार विखे पाटील यांचा निझर्णेश्वर व प्रभावती घोगरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हार बुद्रुक येथे सोमवारी झाला.