Tuesday, October 22, 2024
Homeनगरकाँग्रेसला जिल्ह्यात विधानसभेच्या 6 जागा द्याव्यात

काँग्रेसला जिल्ह्यात विधानसभेच्या 6 जागा द्याव्यात

शिर्डी विधानसभेचाही समावेश || बैठकीत पदाधिकार्‍यांची काँग्रेस पक्ष निरीक्षकांकडे मागणी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात सहा जागा द्याव्या तसेच शिर्डी विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला देण्यात यावी. या ठिकाणी विधानसभेसाठी उमेदवार निवडीचा अधिकार काँग्रेसचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांना देण्यात यावा, अशा विविध मागण्या काँग्रेस पदाधिकार्‍यांनी गुरुवारी शिर्डी येथे काँग्रेस पक्ष निरीक्षकांच्या झालेल्या आढावा बैठकीत मांडल्या.

- Advertisement -

राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्षाने कार्यकर्त्यांना चार्ज करण्याकरिता व उमेदवार चाचपणी करण्याकरिता बैठकांचा धडाका लावला आहे. याच अनुषंगाने गुरुवारी काँग्रेस पक्षाकडून उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी व उत्तराखंडचे आ. मोहम्मद निजाममुद्दीन व राजस्थान मंडावा मतदार संघातील आ. रीटा चौधरी यांनी काँग्रेस पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन शिर्डी लोकसभा मतदार संघातील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करून येणार्‍या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कामाला लागा, असे आवाहन केले.

काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या आयोजित केलेल्या बैठकीत चर्चा दरम्यान पदाधिकार्‍यांनी पक्ष निरीक्षकांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, येणार्‍या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाचा उमेदवार द्यावा. शिर्डी विधानसभेची जागा काँग्रेसला देण्यात यावी तसेच या ठिकाणी उमेदवार निवडीचा अधिकार आ. बाळासाहेब थोरात यांना देण्यात यावा. राज्यात काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून येणार असल्याने पुढील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात हेच होतील, असा विश्वास निरीक्षकांसमोर पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.

काँग्रेस पक्ष निरीक्षकांनी पदाधिकार्‍यांच्या भावना जाणून घेऊन पदाधिकार्‍यांनी केलेली मागणी पक्ष श्रेष्ठींसमोर मांडू, असे सांगत कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागा. पक्ष बळकट करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी जाणून घ्या. अशा सूचना कार्यकर्त्याना केल्या. यावेळी आ. लहू कानडे, सचिन गुजर, करण ससाणे, हेमंत ओगले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, लताताई डांगे, सुरेश थोरात, तालुकाध्यक्ष पंकज लोंढे, शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले, अमृत गायके, राहाता शहराध्यक्ष नितीन सदाफळ, साहिल म्हस्के, प्रसाद शेळके, स्वराज त्रिभुवन, अमोल आरणे, सदाशिव गाडेकर, संतोष हसे, राजेंद्र निर्मळ, रमेश घोगरे, शितल लहारे, अशोक पारधे आदी काँग्रेस पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

शिर्डी विधानसभा निवडणुकीसाठी पदाधिकार्‍यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आयोजित केलेल्या काँग्रेस पक्ष निरीक्षकांच्या बैठकीत महाविकास आघाडीकडून शिर्डी विधानसभा मतदार संघात उमेदवारी करण्यास इच्छुक असलेल्या प्रभावती घोगरे यांनी बैठकीत उपस्थिती दर्शविल्याने काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या भुवया उंचावल्या. प्रभावती घोगरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा त्या शिर्डी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून प्रबळ दावेदार आहेत. त्यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी द्यावी, असे निरीक्षकांच्या आयोजित बैठकीत आ. लहू कानडे, सचिन गुजर, लताताई डांगे यांनी मागणी केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या