शिर्डी |प्रतिनिधी|Shirdi
शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांनी शहरातील अवैध धंद्यांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून पोलिसांनी 19 कमिशन एजंट, अवैध प्रवासी वाहतूक करणारे 4 जण आणि दारूच्या अड्ड्यावर धाड टाकून एकूण 74 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये गाडी आणि दारूचा समावेश आहे.
गुरुवारी पकडण्यात आलेल्या 19 कमिशन एजंटना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना प्रत्येकी 1200 रुपये दंड किंवा सहा दिवसांची कैद अशी शिक्षा सुनावली. मात्र सर्व कमिशन एजंटनी दंड भरून आपली सुटका करून घेतली. यापुढे जर कोणताही कमिशन एजंट पकडला गेला, तर तो ज्या फूल, हार, प्रसाद दुकानावर काम करत असेल, त्या दुकानदारालाही आरोपी करण्यात येईल, असा सक्त इशारा पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिला आहे. पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित गलांडे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
शिर्डीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कंबर कसली आहे. शहरातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून गुन्हेगारीला आळा घालण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख व पोलीस उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्याची मोहीम हाती घेतल्याने त्यांनी सुरू केलेल्या या कारवाई मोहिमेचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. अशा प्रकारची कारवाई सातत्याने सुरू ठेवली तर शिर्डीतील गुन्हेगारी नक्कीच कमी होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.