Tuesday, January 6, 2026
Homeक्राईमAhilyanagar : शिर्डीच्या गुन्ह्यात सावळे विरोधात 1750 पानी दोषारोपपत्र दाखल

Ahilyanagar : शिर्डीच्या गुन्ह्यात सावळे विरोधात 1750 पानी दोषारोपपत्र दाखल

‘ग्रो मोअर’ घोटाळा || दरमहा चांगला परतावा देण्याचे आमिष

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

‘ग्रो मोअर’ कंपनीचा मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे (वय 27, रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी) याच्याविरूध्द आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचे सुमारे 1 हजार 750 पानी दोषारोपपत्र आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राहाता येथील एमपीआयडी विशेष न्यायालयात दाखल केले आहे. दरम्यान, ‘मनीट्रेल’ च्या प्राथमिक अहवालानुसार या संपूर्ण घोटाळ्यात तब्बल 723 कोटी रूपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले असून, अंतिम अहवाल येणे बाकी आहे. गुंतवणुकीवर दरमहा चांगला परतावा मिळेल या आमिषाने नागरिकांची फसवणूक केल्याचा दोषारोप आहे.

- Advertisement -

सावळे आणि त्याच्या साथीदारांनी गुंतवणुकदारांना दरमहा 10 ते 15 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानुसार अनेकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली; मात्र ठरलेला परतावा आणि मूळ गुंतवणूक न देता सर्वांची फसवणूक करण्यात आली. सुरूवातीला राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शिर्डी पोलीस ठाण्यात देखील यासंदर्भातील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

YouTube video player

तपासादरम्यान 16 जुलै 2025 रोजी मुख्य सूत्रधार भूपेंद्र सावळे याला अटक करण्यात आली. पोलीस कोठडीत चौकशीतून सावळे आणि त्याच्या सहकार्‍यांनी ‘ग्रो मोअर’ या नावाने अनेक कंपन्या स्थापन केल्याचे उघड झाले. या कंपन्यांमार्फत कोणतीही आर्थिक परवानगी नसताना नागरिकांकडून कोट्यवधी रूपयांची बेकायदेशीर वसुली करण्यात आली. त्यांना परतावा दिला गेला नाही व गुंतवणुकीची रक्कम देखील परत मिळाली नाही. पोलिसांनी गुंतवणूकदारांचे जबाब नोंदवून, संबंधित पुरावे गोळा करून, भूपेंद्र सावळे विरोधात सुरूवातीला राहाता पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात व नंतर शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात राहाता येथील एमपीआयडी विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

आठ संशयित निष्पन्न
या गुन्ह्यात भूपेंद्र सावळे याच्यासह आठ संशयित आरोपींची नावे निष्पन्न झाले आहेत. त्यातील भूपेंद्र सावळे हा अटकेत असून इतर सात संशयित आरोपी अद्याप पसार आहेत. त्यामध्ये संदीप भास्कर सावळे, राजाराम भटू सावळे (दोघे रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी), पुजा गोकुळ पोटींडे (रा. दिडोंरी रस्ता, एकतानगर, म्हसरूल, जि. नाशिक), भाऊसाहेब आनंदराव थोरात (रा. राहाता), सुबोध सुकदेव पाटील (रा. साईप्रसादनगर, शिर्डी), तसेच अरूण रामदास नंदन आणि सीमा अरूण नंदन (दोघे रा. नाशिक) यांचा समावेश आहे. पसार संशयित आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू असून, त्यांच्या विरोधातही पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. तसेच तपासादरम्यान नवीन संशयित आरोपींचा सहभाग निष्पन्न झाल्यास त्यांच्याविरोधातही कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Nashik Crime : ‘त्या’ खुनामागे छेडछाड! तरुणाच्या हत्येनंतर जमावाची संशयिताच्या घरावर...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पेठरोड परिसरातील (Peth Road Area) अश्वमेघ नगरात तरुणाची निघृण हत्या झाल्यानंतर या घटनेला रविवारी (दि. ४) भरदुपारी गंभीर वळण मिळाले....