Friday, May 3, 2024
Homeनगरशिर्डीत गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त साईभक्तांची गर्दी

शिर्डीत गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त साईभक्तांची गर्दी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डीत गुढीपाडवा व मराठी नववर्ष मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरे करण्यात आले.

- Advertisement -

गुढीपाडव्यानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिराच्या कळसाजवळ परंपरेनुसार गुढी उभारण्यात आली. यावेळी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्यांच्या पत्नी मालती यार्लगड्डा यांनी विधिवत पूजा केली. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी संजय जोरी, सुरक्षा अधिकारी अण्णासाहेब परदेशी, मंदिरप्रमुख रमेश चौधरी, पुजारी, कर्मचारी व शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते. गुढीपाडवा व नवीन वर्षानिमित्त शिर्डीत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी साई भक्तांची व स्थानिकांचीही गर्दी दिसून येत होती. मराठी नववर्षानिमित्त अनेक हॉटेल लॉजवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

परिसरातही घरोघरी गुढी उभारून आपल्या घरांना, हॉटेल, लॉज, दुकाने आदींना तोरणे बांधून, घरासमोर रांगोळी काढून, गुढीची विधिवत पूजा करण्यात आली. गुढीपाडव्यानिमित्त साखरेचे कडे, गाठी असे विविध साखरेचे बनवलेले दागिनेही खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओघ दिसून येत होता. शिर्डीत हार, फुलांनाही मागणी वाढली होती. गुढीपाडव्यानिमित्त विविध कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी पाडवा पहाटचा कार्यक्रमही संपन्न झाला. गुढीपाडव्यानिमित्त बुधवार 22 मार्च रोजी रामनवमी उत्सवासाठी अनेक पालख्या मुंबई व इतर शहरातून श्री साईंची पूजा करत शिर्डीकडे श्री साईचा जयघोष करत निघाल्या आहेत.

मराठी नववर्ष व गुढीपाडव्यानिमित्त प्रत्येकजण एकमेकांना प्रत्यक्ष भेटून भ्रमणध्वनीद्वारे सोशल मीडियाद्वारे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत होते. सर्वत्र नवीन वर्षानिमित्त व गुढीपाडव्यानिमित्त उत्साहाचे आनंदाचे वातावरण दिसून येत होते. गर्दीमुळे शिर्डीत अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी पहावयास मिळाली. त्यामुळे पोलिसांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठी दमछाक होताना दिसून येत होती. सध्या सर्वत्र परीक्षा सुरू असल्यामुळे अनेकांनी साईंचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास करण्याची पसंती दर्शवली असली तरी 30 मार्च रोजी शिर्डीत रामनवमी यात्रा उत्सव असल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. साई संस्थान व पोलीस यंत्रणेने भक्तांची गैरसोय होऊ नये याकरिता तात्काळ उपयोजना करावी, अशी मागणी साई भक्तांकडून केली जात आहे.

ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून साईबाबा संस्थानने 110 कोटींची अद्ययावत दर्शन रांग उभारली आहे. सदर दर्शन रांग लवकरच भक्तांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे. ही दर्शन रांग सुरू झाल्यानंतर साईभक्तांना गर्दीच्या काळात तात्काळ दर्शन घेता येईल, अशी सुविधा साई संस्थानने उपलब्ध केली आहे. 10 हजार साईभक्त एकाचवेळी या रांगेत दर्शन घेण्यासाठी जाऊ शकतील, अशी व्यवस्था केली असल्यामुळे ही दर्शन सेवा लवकर सुरू होण्याची उत्कंठा साई भक्तांना लागली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या