Thursday, March 13, 2025
Homeनगरशिर्डीतील हॉटेल वसंत विहारवर पोलिसांचा छापा

शिर्डीतील हॉटेल वसंत विहारवर पोलिसांचा छापा

तीन मुलींची सुटका || मुख्य आरोपी पसार

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पालखी रोडवरील एका हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय करवून घेत असलेल्या तरुणास शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेत तीन पीडित मुलींची सुटका केली. वेश्या व्यवसाय करून घेणारा मुख्य आरोपी नाना शेळके पसार झाला आहे. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिर्डी येथील पालखी रोडवरील हॉटेल साई वसंत विहारमध्ये तीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात आहे. याबाबत पोलिसांनी हॉटेल साई वसंत विहारमध्ये एक बनावट ग्राहक पाठविले.

- Advertisement -

हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तीस बनावट ग्राहक यांनी शारीरिक सुखाची मागणी केली असता त्या व्यक्तीने त्याच्या हॉटेलमधील मुली दाखवून शारीरिक सुखाच्या मोबदल्यात पैशाची मागणी केली. याबाबत पथकातील अधिकारी व पंचांची खात्री होताच पोलिसांनी हॉटेल साई वसंत विहार येथे नियोजनबद्ध छापा टाकून तीन मुलींना ताब्यात घेतले. वेश्याव्यवसाय चालवणारा आरोपी शुभम अशोक आदमाने (रा.कापूस वडगाव तालुका वैजापूर) यास ताब्यात घेतले असून यातील मुख्य आरोपी त्याचा साथीदार नाना शेळके हा पसार झाला आहे.

तीनही पीडित मुलींना पुढील कारवाईकरिता महिला पोलीस कॉन्स्टेबल पवार यांच्यासोबत शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले आहे. या घटनेतील दोन्ही आरोपींविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सविता भांगरे यांच्या फिर्यादीवरून अनैतिक देह व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 च्या कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिर्डीत राजरोसपणे मोठ्या प्रमाणात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा व्यवसाय सुरू आहे. पोलीस मात्र या गोष्टीकडे कानाडोळा करून दोन-तीन महिन्यांनंतर फक्त एखाद्याच लॉजिंगवर छापा टाकून जुजबी कारवाई करतात. वेशा व्यवसाय शिर्डी शहराच्यादृष्टीने लाजिरवाणी बाब आहे. पोलिसांनी  वेश्या व्यवसाय करणार्‍या लॉजिंगवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या