शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
राज्यातील महायुती सरकारने नेहमीच उज्ज्वल उद्योजकांना पाठबळ देण्याची भूमिका घेतली असून परकीय गुंतवणुकीत आपले राज्य प्रथम स्थानी आहे. कोणत्याही उद्योगाला तीस दिवसांत परवानगी देण्याचे आणि 80 टक्के स्थानिकांना रोजगार देण्याचे धोरण घेतल्यामुळे राज्याच्या औद्योगिक विकासाची निर्णय प्रक्रिया पारदर्शकपणे होत असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये टाटा उद्योग समूहाच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या कौशल्यवर्धिनी प्रशिक्षण केंद्र तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे भूमिपूजन मंत्री उदय सामंत आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी आ. अमोल खताळ, डॉ. सुजय विखे पाटील, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके, रविंद्र गोंदकर, स्वाधीन गाडेकर, टाटा टेक्नॉलॉजीचे सीएमओ प्रीतम गांजेवार, कौशल्य विकास केंद्राचे प्रमुख सुशिलकुमार, संस्थानचे सीईओ गोरक्षनाथ गाडीलकर, उद्योग विभागाचे गणेश राठोड आदी उपस्थित होते.
मंत्री उदय सामंत म्हणाले, औद्योगिक वसाहतीमध्ये कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी उद्योजक रतन टाटांच्या माध्यमातून आठशे कोटी रुपये मंजूर झाले. यातूनच शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांनी पाठपुरावा केला. महसूल मंत्री असताना धाडसी निर्णय विखे पाटील यांनी घेतल्यामुळेच उद्योजकांना जमीन उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले. आज राज्यात परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येत आहे. महायुती सरकारच्या कामाचा परिणाम आहे.
पहिले अडीच वषर्र् आपण पाहिले. दावोस परिषदेमध्ये 15 लाख कोटी रुपयांचे करार झाले. त्यापैकी 80 टक्के करारांची अंमलबजावणी सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील ज्या भागात उद्योग उभे राहात आहेत, तिथे स्थानिक युवकांना नोकरीसाठी प्राधान्य देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. शिर्डीमधील कौशल्य प्रशिक्षण केंद्रातून सात हजार युवकांना प्रशिक्षणाची संधी आहे. फक्त आता शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जेम्स अँड ज्वेलरी कंपनीचे केंद्र देण्याची व्यवस्था करतो. यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेण्याची ग्वाही देवून या कंपनीला असंख्य प्रशिक्षित युवकांची गरज लागणार असल्याचे मंत्री सामंत म्हणाले.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आजचा दिवस खूप ऐतिहासिक आहे. या भागातील युवकांच्या भवितव्याच्या दृष्टीने मोठे पाऊल टाकले गेले आहे. शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून रोजगाराची संधी निर्माण होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशात कौशल्य विकासाचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रशिक्षणातून युवकांना मिळणारा अनुभव उद्याच्या औद्योगिक विकासाला उपयुक्त ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य विकासाचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन झाले आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आली आहे. अतिशय धडाडीने औद्योगिक विकासासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट करून उद्योग येणार असले तरी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. यासाठी पारंपरिक पायाभूत प्रशिक्षणामध्ये बदल करण्याची भूमिका घेऊन औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीने आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्याचे काम करावे लागेल, अशी अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.





