Friday, November 22, 2024
Homeनगरशिर्डी लोकसभा मतदार संघात सरशी कुणाची?

शिर्डी लोकसभा मतदार संघात सरशी कुणाची?

नवीन खासदार आमचाच होणार, कार्यकर्त्यांचे दावे-प्रतिदावे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे आता संपलेले आहेत. चौथ्या टप्प्यात शिर्डी लोकसभेसाठी मतदार संघात शांततेत मतदान पार पडले. आता प्रतिक्षा आहे ती निकालाची.. या निवडणुकीत कोण बाजी मारतो, हे दि. 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे. परंतु आमचाच उमेदवार विजयी होणार असे दावे तीनही बाजूंनी होताना दिसत आहेत. नेमका गुलाल कोण घेणार? याकडे सर्व मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

शिर्डी लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत चांगलीच चुरस पहायला मिळाली. आता विजयाचे आडाखे सुरु झाले आहेत. या निवडणुकीत एकूण 20 उमेदवार आपले नशिब आजमावण्यासाठी रिंगणात उतरले होते. परंतु महायुतीचे अधिकृत उमेदवार मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे, महाआघाडीचे अधिकृत उमेदवार उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात दुरंगी लढत होईल, असे चित्र असतानाच अचानक वंचित आघाडीत प्रवेश करून दुरंगी वाटणार्‍या निवडणुकीत तिरंगी सामना रंगवणार्‍या उत्कर्षाताई रुपवते यांनी वंचितकडून उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीत चांगलीच रंगत आणली. त्यामुळे या तीन उमेदवारांमध्ये चांगलीच रस्सीखेच दिसत असल्याने या उमेदवारांच्या समर्थकांकडून आमचाच उमेदवार कसा निवडून येणार याबाबत दावे सुरू झाले आहेत.

शिर्डी लोकसभा मतदार संघ हा मूळ काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी राजकीय कुरघोड्यांमुळे गेल्या तीन लोकसभा निवडणुकांपासून शिवसेनेने या मतदार संघावर आपले नाव कोरले आहे. गेली 10 वर्षे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे शिवसेनेकडून निवडून आले आहेत. तर त्यापूर्वी माजी सनदी अधिकारी असलेले माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनीही शिवसेनेकडूनच या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. काँग्रेसच्या नेत्या उत्कर्षा रुपवते यांनी या राखीव मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला असल्याने ऐनवेळी वंचित आघाडीत प्रवेश करून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या मतदार संघातील निवडणुकीत रंग भरला होता.

गेली दोन पंचवार्षिक विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. रखडलेल्या निळवंडेच्या कालव्यांना त्यांनी गती दिली. तसेच काही ठिकाणी त्यांच्या निधीतून कामेही झाली. तसेच दहा वर्षांपूर्वी माजी सनदी अधिकारी माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्यांच्या पंचवार्षिकच्या कार्यकाळामध्ये शिर्डी लोकसभा मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये निधी देऊन विकासकामे केली होती. त्यांची कार्यपध्दती येथील मतदार राजा चांगली जाणून आहे. तर शिर्डी लोकसभा मतदार संघ राखीव झाल्यापासून आमच्या समाजाला उमेदवारी दिली गेली नाही म्हणून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, संघटनांचे पदाधिकार्‍यांत नाराजीचा सूर होता. त्याचवेळी वंचितकडूत उत्कर्षाताई रुपवते यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे त्यांचे गठ्ठा मतदान कुणाच्या पदरात पडले याचा कयास ज्याच्या त्याच्या पध्दतीने लावला जात आहे.

शिर्डी लोकसभा निवडणुकीत झालेली तिरंगी लढत चांगलीच लक्षवेधी ठरली. प्रत्येक उमेदवाराने निवडून आल्यानंतर आपण काय करू, आपले व्हिजन मतदारांसमोर मांडले. प्रत्यक्ष मतदान होऊन दोन दिवसांचा कालावधी उलटला. या मतदार संघाचा नवीन खासदार कोण होणार? याची चर्चा मतदार संघात रंगत आहे. प्रत्येक गटात खासदार आमचाच होणार असे दावे केले जात आहेत. परंतु नक्की चित्र दि. 4 जून रोजीच स्पष्ट होणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या