Saturday, July 27, 2024
Homeनगरशिर्डी लोकसभेच्या मैदानात नवा भिडू !

शिर्डी लोकसभेच्या मैदानात नवा भिडू !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आठ महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी एकीकडे राजकीय पक्षांनी कंबर कसली असताना इच्छुकांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. शिर्डी मतदारसंघासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून माजी आमदार सिताराम घनदाट मामा यांचे चिरंजीव व अभ्युदय बँकेचे चेअरमन संदीप घनदाट यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सुत्रांनी ‘सार्वमत’ला दिली. त्यामुळे या मतदारसंघात नवा चेहरा, नव्या ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर अनेक समिकरणे बदलली असून त्याचे परिणाम आगामी निवडणुकीवर होणार आहेत. राज्यातील राजकारणात भाजपने पक्षीय फूट घडवून आणल्यानंतर सत्तेत बसलेल्या शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे अनेकांचा ओढा वाढला. शिर्डी मतदारसंघाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे देखिल शिंदे गटात गेले. 2014 च्या मोदी लाटेत अवघ्या काही दिवसांत खासदार झालेल्या लोखंडेंची दुसरी टर्म सुरू आहे. ते पुन्हा शिंदे गटाकडून रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभेची जागा सेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे जाणार असा अंदाज आहे. खा.लोखंडे शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाकडून उमेदवारी कोणाला, हा प्रश्न चर्चेत आहे. यासाठी काही स्थानिक नावांसह सेनेतील जिल्ह्याबाहेरील नावांवरही चर्चा झडत आहे. या नावांमध्ये आता नव्या नावाची भर पडली आहे.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात गेल्या काही महिन्यात संदीप घनदाट यांनी चाचपणी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी ते काही नेत्यांना भेटून गेले, अशी माहितीही समोर आली आहे. त्यांचे वडील तथा अभ्युदय बँकेचे विद्यमान संचालक सिताराम घनदाट 2009 मध्ये परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. चर्मकार विकास मंडळ आणि लोकनेते सिताराम घनदाट प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे समर्थक नगर जिल्ह्यात सामाजिक कामांमध्ये सक्रीय आहेत. जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय स्थितीचे आकलन त्यांच्याकडे आधीपासूनच आहे. संदीप घनदाट सध्या महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात राज्यात विस्तारलेल्या अभ्युदय बँकेचे विद्यमान चेअरमन आहेत. गृहनिर्माण व्यवसायातही ते सक्रीय आहेत.

प्रत्यक्ष निवडणुकीला अद्याप आठ महिने बाकी आहेत. शिर्डी लोकसभेची जागा युतीकडून भाजप लढवणार की सेना? महाविकास आघाडीत ही जागा यावेळी काँग्रेसला सुटणार की सेनेच्या उद्धव ठाकरे गटाला? भाजप जागा अदलाबदल किंवा चेहराबदल असा काही राजकीय प्रयोग करणार का? सेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर राजकारणात सर्वच रसमिसळ झाल्याने स्थानिक नेत्यांचे गट-तट काय भुमिका घेणार, असे अनेक प्रश्न पुढील काळात चर्चेत असतील. मात्र इच्छुकांच्या तयारीने मतदारसंघात रंगत वाढण्याची चिन्हे आहेत.

पूर्ण ताकदीने लढू

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील घनदाट समर्थक सक्रीय झाले आहेत. स्वत: संदीप घनदाट यांनी काही भेटी-गाठी घेतल्याची चर्चा आहे. चाचपणीअंती त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवायचा निर्णय जवळपास निश्चित केला आहे. त्यासाठी सेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे त्यांनी उमेदवारीची अपेक्षाही व्यक्त केली आहे. संधी दिल्यास पूर्ण ताकदीनिशी लढून शिर्डीची जागा जिंकू, असा विश्वास त्यांनी नेतृत्वाकडे व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी ‘सार्वमत’ला दिली.

निवडणुकीला अद्याप अवकाश आहे. त्यामुळे आताच उमेदवारीवर राजकीय भाष्य करणे उचित ठरणार नाही. तथापी राखीव असलेल्या शिर्डी मतदारसंघात उमेदवारीसाठी पक्षाने संधी दिली, तर आपली तयारी आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माझी भूमिका कळवली आहे. त्यांनी संधी दिली तरच याबाबत पुढील निर्णय घेणार आहे.

संदीप घनदाट, चेअरमन, अभ्युदय बँक.

- Advertisment -

ताज्या बातम्या