शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शिर्डीत सुरू असलेल्या उपोषणाच्या दुसर्या दिवशी अनेक मान्यवरांनी पाठिंबा दिला. मंगळवारी सायंकाळी उपोषण स्थळी काशिकानंद महाराज यांच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी टाळ व मृदंग वाजवत याठिकाणी कीर्तन केले. तसेच शुक्रवारपासून सुरू असलेले साखळी उपोषण देखील सातत्याने सुरू आहे.
शिर्डीत राहाता तालुका सकल मराठा समाज बांधवांनी शुक्रवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. तसेच सोमवारपासून हे उपोषण अधिक तीव्र करण्यासाठी अमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला. सचिन चौगुले, अनिल बोठे, रवींद्र गोंदकर, नितीन कोते, प्रशांत राहणे, कानिफ गुंजाळ, प्रकाश गोंदकर यांनी आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेऊन जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला आहे. शिर्डीत शुक्रवारपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणास तसेच आमरण उपोषणास विजय काळे, ताराचंद कोते, मनसेचे दत्तात्रय कोते, वीरेश बोठे, विकास गोंदकर, गणेश कोते, वैभव कोते व आदी समाज बांधव दररोज याठिकाणी उपस्थित राहून पाठिंबा देत आहे.
राहाता तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने 27 तारखेपासून राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी करून राजकीय कार्यक्रम व सभा घेण्यास बंदी केली आहे. तरी देखील कोणी जाहीर सभा व राजकीय कार्यक्रम घेतल्यास त्यांच्या विरोधात जाहीरपणे निदर्शने व निषेध करण्यात येईल, असा इशारा रविंद्र गोंदकर यांनी दिला आहे.
उपोषणास बसलेल्या नागरिकांची काळजी घेत आहे.आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी शांततेच्या मार्गाने जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या समर्थनार्थ आम्ही सात मराठा बांधव आमरण उपोषणास बसलो आहे. शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण,आमरण उपोषण करावे. तोडफोड, जाळपोळ या सारखे हिंसक आंदोलन करू नये. असं आवाहन जरांगे पाटलांनी महाराष्ट्राला केले आहे. त्याच पद्धतीने राहाता तालुक्याच्या वतीने शिर्डीत सुरू असलेले आमरण उपोषण हे शांततेच्या मार्गाने सुरू आहे. कुणीही तोडफोड, जाळपोळ किंवा हिंसा होईल अशा प्रकारचे आंदोलन करू नये.
– सचिन चौगुले