Monday, May 27, 2024
Homeनगररामनवमी अध्यक्ष निवडीचा वाट ना. विखेंच्या कोर्टात

रामनवमी अध्यक्ष निवडीचा वाट ना. विखेंच्या कोर्टात

शिर्डी (प्रतिनिधी)

रामनवमी उत्सव अध्यक्षपदाचा वाद महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कोर्टात गेला असून ना. विखे पाटील याबाबत काय तोडगा काढतात याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

शिर्डी रामनवमी उत्सव अध्यक्ष निवडीचा वाद गेल्या पाच दिवसांपासून सुरू असल्यामुळे दोन्ही गट आपलाच अध्यक्ष असावा या निर्णयावर ठाम असल्यामुळे या प्रश्नाबाबत दोन्ही गटाच्या स्वतंत्र बैठका तसेच एकत्रित बैठका होऊन देखील याबाबत कुठलाही तोडगा निघाला नाही. अखेर रामनवमी उत्सव अध्यक्ष निवडीचा वाद महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कोर्टात गेला. महसूल मंत्री विखे पाटील याबाबत काय तोडगा काढतात याची उत्कंठा शिर्डीकरांना लागली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे मंत्री विखे अधिवेशनाच्या कामकाजात गुंतले आहेत. शनिवार व रविवार अधिवेशनाला सुट्टी असल्यामुळे ते मतदार संघात येण्याची शक्यता आहे. त्यावेळी दोन्ही गट ना. विखे पाटील यांची भेट घेणार आहेत. विखे पाटील मतदार संघात येत्या दोन ते तीन दिवसांत आले नाही तर खा. सुजय विखे पाटील हे शिर्डी येथे एका कार्यक्रमासाठी येणार असून हा प्रश्न त्यांच्याजवळ मांडणार असल्याचे दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांनी सार्वमतशी बोलताना सांगितले. त्यामुळे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील किंवा खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी या प्रश्नी मध्यस्थी केली तरच अध्यक्ष निवडीचा प्रश्न सुटू शकेल असे शिर्डी ग्रामस्थ तसेच दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांचे मत आहे.

रामनवमी उत्सवासाठी दोन गट दोन अध्यक्ष निवडीची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत आल्याने व रामनवमीला काही दिवस बाकी असल्याने हा प्रश्न लवकर मिटावा अशी ग्रामस्थांची इच्छा आहे. परंतु दोन्ही गटाकडून गेल्या चार दिवसांपासून बैठकींचा सिलसिला सुरू आहे. बैठकीत अध्यक्ष निवडीचा प्रश्न बाजूलाच राहून अनेक जण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून आले. परिणामी अनेकदा बैठकीत शाब्दिक चकमक देखील बघायला मिळाली. अनेकांनी यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु दोन्ही गट आपल्या निर्णयावर ठाम असल्यामुळे यात कोणी माघार घ्यायला तयार नाही.

त्यामुळे यावर्षी दोन गटाचे दोन रामनवमी उत्सव होतील की काय अशी चर्चा आता शिर्डीत रंगू लागली आहे. असे असले तरी शिर्डीत १११ वर्षांपासून साईबाबांनी सुरू केलेल्या या रामनवमी उत्सवाला राजकीय वळण येऊ नये अशी शिर्डीकरांची इच्छा आहे. नगरपरिषदेची निवडणूक काही महिन्यांनंतर होत असल्यामुळे शिर्डीतील अनेक इच्छुक उमेदवारांनी आत्तापासूनच आपले राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याकरिता तयारी सुरू केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. येणारा उत्सव शिर्डीत अनेकांनी प्रतिष्ठेचा करत आपली राजकीय शक्ती दाखवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्याची उपाययोजना सुरू केली आहे. त्यामुळे रामनवमी उत्सवाला देखील यावर्षी नगरपरिषद निवडणूक डोळ्यापुढे ठेवून मोठे महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसते. असे असले तरी धार्मिक कार्यक्रमाला राजकीय वळण नको असे दोन्ही गटांतील काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या