Wednesday, January 7, 2026
HomeनगरShirdi : शिर्डीत एआयमुळे भाविकांची अचूक नोंद होणार

Shirdi : शिर्डीत एआयमुळे भाविकांची अचूक नोंद होणार

संशयीत आणि गुन्हेगार शोधण्यासही होणार मदत

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानात अत्याधुनिक एआय आधारित पीपल काउंटिंग प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला आहे. या प्रणालीमुळे दररोज साईबाबांचे दर्शन घेणार्‍या भाविकांची अचूक आकडेवारी संस्थानकडे उपलब्ध राहील.यामुळे गर्दीचे योग्य नियोजन करता येईल. शिवाय या प्रणालीत फेस डिटेक्शन तंत्रज्ञानाचा समावेश आगमी काळात संशयित तसेच गुन्हेगार शोधणे शक्य होणार आहे.

- Advertisement -

भाविकांच्या सुरक्षेसोबतच दर्शन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने साईबाबा संस्थानात अत्याधुनिक एआय आधारित पीपल काउंटिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ही प्रणाली फ्रिज्मा एआय कंपनीच्या देणगीने उपलब्ध झाली असून तिचा शुभारंभ साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि कंपनीचे अध्यक्ष डॉ. श्रीराम अय्यर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, राहुल गलांडे यांच्यासह कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अमिताभ रॉय चौधरी तसेच संस्थानचे विविध विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

YouTube video player

नवीन प्रणालीद्वारे मंदिर परिसरातील प्रमुख प्रवेशद्वारांवरून येणार्‍या भाविकांची अचूक नोंद होणार आहे. दर्शनानंतर मुखदर्शन आऊट व बुंदी प्रसाद आऊट येथेही भाविकांचे आऊट काउंटिंग करण्यात येणार असून यामुळे दररोज साईबाबांचे दर्शन घेणार्‍या भाविकांची आकडेवारी संस्थानाकडे उपलब्ध राहील. ही माहिती गर्दी नियंत्रण, सुविधा व्यवस्थापन व नियोजनबद्ध सेवा यासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रणालीत फेस डिटेक्शन तंत्रज्ञानाचा समावेश असून संशयित अथवा गुन्हेगारांचे फोटो पूर्वनियोजित पद्धतीने डेटाबेसमध्ये अपलोड केले जातील. अशा व्यक्तींची उपस्थिती आढळल्यास सुरक्षा यंत्रणेला तात्काळ सूचना मिळून त्वरित कारवाई करता येईल. यामुळे मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत लक्षणीय बळकटी येणार आहे.

भाविक संख्येच्या अचूक नोंदीमुळे भोजन, निवास व अन्य सुविधा अधिक नियोजनबद्धपणे उपलब्ध करून देता येतील. तसेच गर्दीच्या वेळी गेटनिहाय भाविकांचे विभाजन करून दर्शन प्रक्रियाही अधिक सुकर होणार आहे. सध्या ही प्रणाली नवीन दर्शन रांग येथील कॅमेर्‍यांवर सुरू करण्यात आली असून आगामी काळात पालखी रोडसह पोलीस स्टेशनच्या अखत्यारीतील कॅमेरेही या यंत्रणेशी जोडले जाणार आहेत. ही एआय आधारित पीपल काउंटिंग प्रणाली साईबाबा संस्थानाच्या दर्शन व सुरक्षा व्यवस्थापन क्षेत्रात अतिशय उपयुक्त ठरेल, असा विश्वास संस्थानातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...