शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
साईनगरीत दर्शनासाठी येणार्या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची वाहने रस्त्यात अडवणे, त्यांना विशिष्ट दुकानातून अव्वाच्या सव्वा दराने पूजा साहित्य घेण्यास भाग पाडणे आणि खासगी पार्किंगचा आग्रह धरणे अशा प्रकारांना चाप लावण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी माणिक आहेर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 152 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे शिर्डीत हैदोस घालणार्या दलालांचे धाबे दणाणले असून, नियमांचे उल्लंघन करणार्यांवर आता थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत.
शिर्डी (Shirdi) शहराच्या प्रवेश मार्गांवर आणि सार्वजनिक रस्त्यांवर खासगी व्यक्तींकडून भाविकांची वाहने बेकायदेशीरपणे अडवून त्यांची दिशाभूल केली जात असल्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली होती. अनेकदा हे एजंट भाविकांना दमदाटी, शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत असल्याने साईनगरीच्या प्रतिमेला तडा जात होता. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे. कोणत्याही व्यक्तीला आता स्वतःला संस्थान किंवा प्रशासनाचा प्रतिनिधी भासवून भाविकांना फसवता येणार नाही. भोजन, निवास किंवा दर्शनाच्या नावाखाली मध्यस्थी करणार्यांवर आता प्रशासनाची करडी नजर असणार आहे.
या आदेशानुसार शिर्डीतील सार्वजनिक रस्ते, चौक आणि बसथांब्यांवर प्रवाशांना अडवून त्यांची मानसिक कोंडी करणार्यांवर आता कलम 223 अन्वये कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. भाविकांना मुक्त वातावरणात दर्शन घेता यावे आणि त्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी, हा या आदेशामागचा मुख्य उद्देश आहे. 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत संबंधित व्यक्तींना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली असली, तरी तोपर्यंत शिर्डीतील ही ‘एजंटगिरी’ मोडून काढण्यासाठी प्रशासनाने आपला चाबूक फिरवला आहे. या निर्णयाचे सर्वसामान्य साईभक्तांकडून जोरदार स्वागत होत आहे.





