Friday, November 22, 2024
Homeनगरसाईनामाने शिर्डी नगरी दुमदुमली; गुरुपौर्णिमा उत्सवास सुरुवात

साईनामाने शिर्डी नगरी दुमदुमली; गुरुपौर्णिमा उत्सवास सुरुवात

शेकडो पालख्या साईनगरीत दाखल

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवास शनिवारी उत्साही वातावरणात सुरुवात झाली. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे 5.15 वाजता श्रींची काकड आरती झाल्यानंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी पोथी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी विणा तर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, मंदिर प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

मिरवणूक व्दारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या पारायणाच्या शुभारंभ उत्सवाचे निमित्ताने जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व पत्नी मिनाक्षी यांनी श्रींची पाद्यपूजा केली. दुपारी 12.30 वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. उत्सवाचे पहिल्या दिवशी अमेरिकेचे वाणिज्य महादुतावास माईक हँकी यांनी श्री साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावली. सायंकाळी 4 वाजता मंदार व्यास, डोंबिवली यांचा कीर्तन झाले. सायंकाळी 7 वाजता श्रींची धुपारती, 7.30 वाजता प्रशांत भालेकर, मुंबई यांचा स्वरधुणी साई गीतांचा कार्यक्रम, रात्री 9.15 वाजता श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात येईल. यावेळी संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात.

पालखी मिरवणूक परत आल्यानंतर श्रींची शेजारती होईल. तसेच पारायाणासाठी व्दारकामाई रात्रभर उघडे ठेवण्यात येईल.
यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने दानशूर साईभक्त सुभा पै. अमेरीका यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात केलेली फुलांची आकर्षक सजावट व साईराज डेकोरेटर्स, मुंबई यांनी मंदिर व परिसरात केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने साईभक्तांचे लक्ष वेधुन घेतले. दरवर्षीप्रमाणे पुणे येथून आलेल्या श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या पदयात्री भाविकांनी उत्सवात हजेरी लावली.

आज उत्सवाच्या मुख्य दिवशी रविवार दि. 21 जुलै रोजी पहाटे श्रींची काकड आरती, अखंड पारायण समाप्ती व श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी श्रींची पाद्यपुजा, सकाळी 10 वा. नाना वीर, शिर्डी यांचा साईभजन कार्यक्रम, दुपारी 12.30 वाजता माध्यान्ह आरती, दुपारी 1 वा. संजीव कुमार, पुणे यांचा भजन संध्या, सायंकाळी वा. संतोष पित्रे, डोंबिवली यांचे कीर्तन, सायंकाळी 7 वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ 7.30 ते 10 यावेळेत श्री निरज शर्मा, दिल्ली यांचा भजन संध्याचा कार्यक्रम, रात्रौ 9.15 वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे. हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असून, या दिवशी श्रींची शेजारती व सोमवार 22 जुलै रोजीची पहाटेची श्रींची काकड आरती होणार नाही. या दिवशी रात्रौ 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साईभजन हजेरी कार्यक्रम मंदिराशेजारील स्टेजवर होणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या