Tuesday, January 6, 2026
HomeनगरShirdi : शिर्डीत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी साई महोत्सवाचा दिमाख

Shirdi : शिर्डीत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी साई महोत्सवाचा दिमाख

31 डिसेंबरला मंदिर रात्रभर उघडे राहणार

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

नाताळची सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शिर्डीत येणार्‍या लाखो साईभक्तांच्या स्वागतासाठी साईबाबा संस्थान सज्ज झाले आहे. 25 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत आयोजित शिर्डी महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, 31 डिसेंबर रोजी साईंचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. या काळात दर्शनासाठी येणार्‍या 53 पालख्यांची नोंदणी झाली असून भाविकांसाठी निवास, आरोग्य आणि सुरक्षिततेचे चोख नियोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

साईभक्तांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन साईधर्मशाळा आणि भक्तनिवास परिसरात 46 हजार चौरस फुटांचे भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. दर्शनासाठी ताटकळावे लागणार्‍या भाविकांसाठी चहा, कॉफी, दूध आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दर्शन रांगेतच करण्यात आली आहे. तसेच आरोग्य सुविधेसाठी ठिकठिकाणी प्रथमोपचार केंद्र आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी पोलीस दलासह संस्थानचे 1000 हून अधिक कर्मचारी, शीघ्र कृती दल आणि बॉम्ब शोधक पथक चोवीस तास तैनात राहणार आहे.

YouTube video player

उत्सवाच्या काळात लाडू प्रसादाची टंचाई भासू नये यासाठी संस्थानने सुमारे 120 क्विंटल साखरेची बुंदी पाकिटे आणि 400 क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू तयार केले आहेत. भक्तांच्या सोयीसाठी दर्शन रांग, मंगल कार्यालय, द्वारकामाई आणि सर्व निवासस्थानांच्या ठिकाणी अतिरिक्त लाडू विक्री केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. 30 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात हनुमान मंदिराजवळील शताब्दी मंडपात विविध नामवंत कलाकारांच्या भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे.

यात प्रविण महामुनी, भजन सम्राट नाना वीर, सोनाली दीदी करपे आणि दासगणु महाराज जयंतीनिमित्त सामुहिक स्तवन मंजरी वाचनाचा समावेश आहे. 31 डिसेंबर रोजी मंदिर रात्रभर उघडे राहणार असल्याने रात्रीची शेजारती आणि 1 जानेवारीची पहाटेची काकड आरती होणार नाही, याची भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

नवीन नाशकात प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik प्रचारासाठी बोलाविलेल्या तब्बल ६५ महिलांना दिवसभर ताठकळत ठेवत अन्न पाण्याशिवाय पैसे न दिल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने...