अहमदनगर । Ahmednagar
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी शहराचा ५० मेगावॅट क्षमतेचा वीजपुरवठा आता टप्प्याटप्प्याने पर्यावरणपूरक सौर ऊर्जेवर नेण्याचा निर्णय महावितरण, शिर्डीचे श्री साईबाबा संस्थान व महाऊर्जा यांच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये नुकताच घेण्यात आला. त्यानुसार शिर्डी शहरातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा, सरकारी कार्यालये, कृषी आदी सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे.
शिर्डी शहराच्या ‘सौर’ वीज पुरवठ्याच्या नियोजनासाठी मुंबई येथे महावितरणच्या मुख्यालयात नुकतीच उच्चस्तरीय बैठक झाली. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, महाऊर्जाच्या महासंचालक सौ. कादंबरी बलकवडे, महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, कार्यकारी संचालक धनजंय औंढेकर, मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अतिरिक्त महासंचालक पंकज तगलपल्लेवार, अहमदनगरचे अधीक्षक अभियंता रमेश पवार, संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांची उपस्थिती होती.
हे ही वाचा : अभिनेता राजपाल यादवची करोडोंची संपत्ती जप्त; कारण काय?
शिर्डी शहरात महावितरणचे सर्व वर्गवारीमध्ये १० हजार ९२५ वीजग्राहक आहेत व त्यांचा वार्षिक ८२ दशलक्ष युनिट विजेचा वापर आहे. या ग्राहकांना ३३/११ केव्ही शिर्डी उपकेंद्राद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या शिर्डी शहरात समाधी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी दररोज सुमारे ६० हजार भाविक येतात.
सणासुदीच्या दिवसांत ही संख्या १० लाखांवर जाते. त्यामुळे साईबाबा संस्थानच्या ६५०० खोल्यांचे भक्तनिवास, प्रसादालय, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्था आदी १० उच्च व २ लघुदाबाच्या वीजजोडण्या आहेत. यासह सरकारी कार्यालय- ११७, घरगुती- ८०८४, वाणिज्यिक- २०५१, औद्योगिक- १४१, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स- ९ तसेच कृषी व इतर ५११ वीजजोडण्या आहेत. तर सद्यस्थितीत शहरात ४.६५ मेगावॅट क्षमतेचे सरकारी व वैयक्तिक १३१ सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यान्वित आहेत.
हे ही वाचा : Hindenburg Report च्या आरोपांवर सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच काय म्हणाल्या?
‘सौर’ शिर्डी शहरासाठी पहिल्या टप्प्यात श्री साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांच्या वापराकरिता ४२ एकर जमिनीवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी महाऊर्जाकडून संस्थानला आवश्यक तांत्रिक सहकार्य होणार आहे. या प्रकल्पाद्वारे संस्थानच्या सर्व वीजजोडण्या सौर ऊर्जेवर नेण्यात येतील.
तसेच सौर प्रकल्पातील शिल्लक वीज महावितरण खरेदी करणार आहे. शिर्डी शहरातील सर्व सरकारी कार्यालये, घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना देखील ‘सौर’द्वारे वीजपुरवठा करण्यात येईल. त्यासाठी २७ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी १२५ एकर जमिनीची आवश्यकता आहे.
महाऊर्जाच्या सहाय्याने शिर्डीतील सर्व पथदिवे सौर ऊर्जेवर नेण्याचे नियोजन असून त्यासाठी डीपीडीसीमधून निधीची मागणी करण्यात येईल. तसेच ४९७ कृषी ग्राहकांना शिर्डीऐवजी राहता येथील निमगाव ३३/११ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जाणार आहे. उल्लेखनीय म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेतून निमगाव उपकेंद्रातील कृषी वीजवाहिन्यांना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा होईल.
हे ही वाचा : हाथरसची पुनरावृत्ती! सिद्धनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, सात भाविकांचा मृत्यू
सोबतच महावितरणच्या शिर्डी उपकेंद्र परिसरातील पथदिव्यांसह इतर वीजवापर देखील छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प उभारून करण्यात येणार आहे. शिर्डी शहरात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची प्रत्येक घरगुती ग्राहक व गृहनिर्माण संस्थांना माहिती देण्यात येईल व सर्वेक्षण करण्यात येईल. या योजनेचा लाभ घेत अनुदानातून घरोघरी छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी महावितरणचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर वीजग्राहकांना सहकार्य करणार आहे.