शिरूर । तालुका प्रतिनिधी
शिरूर पोलिसांनी अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर मोठी कारवाई करत एम.डी. (मॅफेडॉन) विक्रीसाठी आलेल्या तरुणास जेरबंद केले आहे. आरोपीकडून अंमली पदार्थासह स्कुटी असा एकूण ७२,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शिरूर परिसरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने शिरूर नगरपरिषदेपुढे सापळा रचला. त्यावेळी संशयित युवक अॅक्टीव्हा स्कुटी (क्र. एमएच १२ एमटी ६८३९) वरून आला असता त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याचे नाव पवन सागर भंडारे (वय १९, रा. वाडा कॉलनी, शिरूर) असे निष्पन्न झाले. पंचासमक्ष अंगझडती घेतली असता आरोपीकडून २ ग्रॅम ८० मिली पांढऱ्या रंगाचा मॅफेडॉन (एम.डी.) अंमली पदार्थ प्लॅस्टिकच्या पुडीत मिळून आला. त्यासह स्कुटी जप्त करण्यात आली असून, सदर मुद्देमालाची किंमत ७२,००० इतकी आहे.
या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं. ६४७/२०२५, एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस न्यायालयाने १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दिपक करांडे करीत आहेत.
दरम्यान, या कारवाईत पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शन लाभले. तर कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक करांडे, पोलिस उपनिरीक्षक गोविंद खटींग, डी. बी. पथकाचे उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस हवालदार नितीन सुद्रीक तसेच पोलिस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, सचिन भोई, निरज पिसाळ, निखील रावडे, पवन तायडे, भाऊसाहेब ठोसरे, अजय पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. शिरूर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, नागरिकांनी पोलिसांच्या सतर्कतेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.




