Wednesday, February 4, 2026
Homeराजकीयशिवसेनेचे मंत्री नाराज? मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

शिवसेनेचे मंत्री नाराज? मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

मुंबई । Mumbai
राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री नाराज असल्याने त्यांनी आज (मंगळवार) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीला जवळपास सर्वच शिवसेना नेते गैरहजर असल्याचे दिसून आले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

शिवसेनेच्या मंत्र्यांची नाराजी ही काही नवीन नाही. यापूर्वी निधीवाटपाच्या मुद्द्यावरून शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. मात्र, आता महायुतीमध्ये अंतर्गत होत असलेल्या पक्षांतरामुळे शिवसेनेचे मंत्री अधिक संतप्त असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची प्रक्रिया वाढल्याने शिवसेनेमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

शिवसेनेच्या मंत्र्यांच्या गैरहजेरी आणि नाराजीच्या चर्चांवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी नाराजीच्या बातम्या फेटाळून लावल्या. बावनकुळे म्हणाले की, “कुणीही मंत्री नाराज नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः बैठकीला हजर होते.” मंत्र्यांच्या अनुपस्थितीचे कारण स्पष्ट करताना बावनकुळे म्हणाले, “सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी सुरू आहे. त्यामुळे भाजपसह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आपापल्या प्रभारी असलेल्या ठिकाणी गेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनेच हे सर्व मंत्री बाहेर आहेत. त्यामुळे बैठकीला मंत्र्यांची संख्या कमी दिसली. याला नाराजी म्हणता येणार नाही.”

YouTube video player

महायुतीतील नेत्यांचे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर होत असल्याच्या प्रश्नावरही बावनकुळे यांनी उत्तर दिले. तिन्ही पक्षांनी (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी) एकमेकांच्या पक्षात प्रवेश करायचा नाही, असे निश्चित केले होते. मात्र, “मधल्या काळात काही अपरिहार्य घटना घडल्या. त्यामुळे काही लोक भाजपमधून शिवसेनेत गेले, शिवसेनेचे काही लोक राष्ट्रवादीत गेले, तर काही लोक आमच्यात आले,” असे ते म्हणाले.

झालेल्या या सर्व पक्षांतराच्या प्रकाराबाबत तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून यावर निर्णय घेतील, असे बावनकुळे यांनी पुढे स्पष्ट केले. “आमचे काही पदाधिकारी किंवा माजी लोकप्रतिनिधी शिवसेनेत गेले, काही राष्ट्रवादीत गेले, काही आमच्यात आले, त्यामुळे काही प्रमाणात नाराजी तयार झाली असेल, हे खरे आहे. पण आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतल्या गैरहजेरीचे हे कारण नव्हते,” असे त्यांनी स्पष्ट केले.

बावनकुळे यांनी नाराजीचे वृत्त फेटाळले असले तरी, शिवसेनेच्या मंत्र्यांनी बैठकीवर घातलेला बहिष्कार आणि पक्षांतरामुळे निर्माण झालेली अस्वस्थता पाहता महायुतीत सध्या काहीतरी अंतर्गत समस्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. आगामी काळात तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते या विषयावर काय निर्णय घेतात आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची नाराजी दूर करण्यासाठी काय उपाययोजना करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमधील हा अंतर्गत तणाव त्यांच्या कामगिरीवर कसा परिणाम करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी युतीमधील या घडामोडींमुळे विरोधी पक्षांना टीकेसाठी एक आयतेच कोलीत मिळाल्याचे चित्र आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ व जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद (Zilla Parishad) स्तरावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर...