मालेगाव | प्रतिनिधी Malegaon
सटाणा नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या हर्षदा पाटील यांनी योगिता मोरे यांचा दणदणीत पराभव करत विजय संपादन केला.
दरम्यान, नगर परिषदेत नगरसेवक पदाच्या २४ पैकी १५ जागा जिंकत भाजपाने वर्चस्व प्रस्थापित केले असले तरी नगराध्यक्षपद हिरावले गेल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते हिरमुसले आहेत. भाजपच्या बंडखोर रूपाली कोठावदे यांची बंडखोरी भाजपच्या विजयी रथाला ब्रेक देण्यास कारणीभूत ठरली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या योगिता मोरे, शिवसेना शिंदे गटाच्या हर्षदा पाटील व भाजपच्या बंडखोर रूपाली कोठावदे यांच्यात तिरंगी सामना झाला होता. या निवडणुकीत नगरसेवक पदाच्या २४ पैकी दोन जागांवर या आधीच भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे २२ जागांसाठी ७४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
आज रविवारी मतमोजणीअखेर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या हर्षादा पाटील यांना १० हजार ३७ मते मिळाली. भाजपाच्या योगिता मोरे यांना ७ हजार ३७३ तर भाजपातून बंडखोरी केलेल्या रूपाली कोठावदे यांना ५ हजार ७४१ मते मिळाली. नगर परिषदेत भाजपाने सर्वाधिक १५ जागा जिंकल्या. शिंदे गट ४ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. ४ जागांवर अपक्ष निवडून आले आहे.
नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते व व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीधर कोठावदे यांच्या स्नुषा रूपाली कोठावदे या भाजपच्या उमेदवारीसाठी आग्रही होत्या. मात्र भाजपाने माजी नगराध्यक्ष सुनिल मोरे यांच्या पत्नी योगिता मोरे यांना उमेदवारी दिली होती. याचा परिणाम कोठावदे गट नाराज झाला. निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्याचा आक्षेप घेत कोठावदे यांनी बंडाचे निशान फडकावले होते. त्यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी म्हणून भाजपा पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्नही केले गेले. मात्र त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. भाजपच्या नाराज गटाने सारी ताकद कोठावदे यांच्या पाठीशी उभी केली. त्यामुळे अपक्ष लढणार्या कोठावदे या निवडणुकीच्या स्पर्धेत आल्याचे चित्र निर्माण झाले. त्या विजयी झाल्या नसल्या तरी त्यांनी घेतलेली ५ हजार ७४१ मते भाजपाच्या पराभवाला कारणीभूत ठरली असल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली होती. ही माघार शिंदे गटाला विजयाकडे नेणारी ठरल्याची चर्चा शहरात रंगली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष देत रणनिती आखली होती. युवा सेनेचे अविष्कार भुसे निवडणूक काळात सटाण्यात तळ ठोकून होते.




