राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
घरात सर्वांच्या भल्याचा विचार करणारी स्त्री हीच खरी घरची लक्ष्मी असते. दिवाळीचे लक्ष्मीपूजन करताना लक्ष्मी बरोबरच गणपतीची पूजा केली तरच लक्ष्मी घरात विराजमान होईल, असे प्रतिपादन पंडित प्रदीप मिश्रा यांनी शिवपुराण कथेच्या सांगता सोहळ्यात केले. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवपुराण कथेची सांगता गुरुवारी अस्तगाव पिंप्री निर्मळ शिवेवर झाली.
लाखो भाविकांच्या उपस्थितीत ‘हर हर महादेव’ आणि ‘शिवसुताय नमोस्तुभ्य’ या सामूहिक नामघोषणात झाली. पहाटेपासूनच भाविकांचा ओघ कथास्थळी दाखल झाला होता. सकाळी साडेआठ वाजता पंडित मिश्रा महाराज यांचे व्यासपीठावर आगमन झाले. प्रारंभी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंडितजींचे औपचारीक पूजन करून त्यांना पारंपरिक पगडी आणि डमरू देऊन सन्मानित केले.
शिव-पार्वतीचा प्रसंग सांगत मिश्रा म्हणाले, माता पार्वतीने भगवान शिवांना विचारले, मी तुमच्याबरोबर अनेक रूपांत विवाह केला. आता मी पार्वती बनून जन्म घेतला आहे. हा माझा शेवटचा जन्म असावा, जन्म-मृत्यूच्या फेर्यातून माझी सुटका व्हावी. त्यावर भगवंत शिव म्हणाले, पार्वती, मनुष्य पृथ्वीवर राहतो, देव देव लोकात, गंधर्व असतील. हे सर्व माझे भजन करतात. अप्सरा, गंधर्व, साप, योनी, मनुष्य हे सर्व माझी आराधना करतात, माझे भजन करतात, ते मुक्ती मिळवतात. शिवाच्या आराधने शिवाय या संसारात मुक्ती नाही.
राक्षसांनी सर्व देव, गंधर्व, अप्सरा, नाग जमात आदिंवर कब्जा केला आणि राक्षस पाताळात जाऊ लागले. अशी कथा सांगत असतांना पंडित प्रदीप मिश्रा यांनी शेषनागाची पत्नी नागलक्ष्मी यांनी पुढाकार घेऊन सर्व देव, सर्व गंधर्व, अप्सरा, नाग या सर्वांना शिवाची आराधना करण्यासाठी सांगितले. त्यावर पंडित मिश्रा म्हणाले, नागलक्ष्मीने सर्वांच्या हितासाठी पुढाकार घेतला. हा संदर्भ देत पंडित मिश्रा म्हणाले, घरात जी स्त्री सर्वांचे हित पाहते ती लक्ष्मी असते. नागलक्ष्मीने सर्वांना शिव आराधना करायला सांगितले. पाच दिवसांत शिव भगवंत प्रसन्न करून घ्यायचे असते. शिव नामाचा जप करा, असे तिने सांगितले. त्यावर पंडित मिश्रा म्हणाले, आपण सर्वांनी दीपावलीच्या पाच दिवसांत शिवाचे ध्यान करा, शिव भगवंताला बेलपत्र वाहा! यातून तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.
आजपर्यंत झालेल्या शिवपुराण कथेतील सर्वात भव्य आणि सुयोग्य नियोजनाने आयोजित केलेली कथा असा गौरवपूर्ण उल्लेख करून प्रदीप मिश्रा यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक केले. शिर्डीच्या पावन भूमीतील शिवपुराण कथा भगवान शंकराची आराधना करण्याचा संदेश देणारी आहे. आपण तेहतीस कोटी देवांपैकी कोणाचीही आराधना करीत असलो तरी, भगवान शंकराला तुम्हाला मानावेच लागेल. पंढरपूरच्या दिलेल्या संदर्भाचा उल्लेख करून पंडित मिश्रा महाराज म्हणाले की, प्रसन्नता आणि निर्मळ भावाने एक लोटा जल महादेवाला समर्पित करा.
शिवपुराण कथेला का जाता, म्हणून विचारणारे तुम्हाला खुप भेटतील, समाज माध्यमांवर काहीजण प्रतिक्रिया देतील, पण काही करायचे असेल तर स्वतःच्या मनाचे राजे व्हा, स्वतःचा रिमोट स्वतःकडे ठेवा. आपल्या जीवनाचा रिमोट दुसर्यांच्या हाती देवून जगू नका. आपल्या जीवनाचे हक्कदार आपणच आहोत हे नक्की लक्षात ठेवायचे आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात या शिवनगरीमध्ये भाविकांचा भवसागर निर्माण झाला आहे असे सांगितले. पंडितजींच्या मुखातून मागील पाच दिवस आपण सर्वांनी ऐकलेली शिवपुराण कथा ही जीवनाच्या सुखाचा एक नवा मार्ग सादर करणारी ठरली आहे. कार्तिक महिन्याच्या पावन पर्वात ऐकायला मिळालेली शिवपुराण कथा ही आपल्या सर्वांच्या आयुष्यासाठी एक नवा आयाम ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करून, डॉ. सुजय विखे पाटील आणि त्यांच्या सर्व टीमने आव्हानात्मक परिस्थितीवर मात करून हा आध्यात्मिक यज्ञ यशस्वी केला. त्यांचे अभिनंदन करत, लाखो भाविकांनी अतिशय उत्साहाने या शिवपुराण कथेमध्ये दाखविलेल्या उपस्थितीमुळे हा आध्यात्मिक सोहळा अधिक आनंददायी ठरला. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी सर्व शासकीय विभागांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रांरभी शिवपुराण कथेच्या नियोजनाचा आढावा घेताना सांगितले, या सोहळ्यासाठी मंडप टाकतानाही मोठ्या स्वरुपात पाऊस पडला आणि कथेच्या सांगतेला देखील पावसाने हजेरी लावली. हा परमेश्वरी योगायोग असल्याचे नमूद करून भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून सर्व स्वयंसेवक कार्यकर्ते रांत्रदिवस मेहनत घेत होते. सर्वांनी मोठ्या उत्साहाने यामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
सांगता समारंभास आ. विठ्ठलराव लंघे, आ. अमोल खताळ, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद भंडारी, अपर पोलिस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे, शालिनीताई विखे पाटील, कोपरगावच्या माजी आ. स्नेहलता कोल्हे, धनश्री विखे पाटील, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसिलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड यांच्यासह जिल्हा आणि राज्यातून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





