Saturday, July 27, 2024
Homeनगरकर्डिले पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश

कर्डिले पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

माजी मंत्री शिवाजी कर्डिले, त्यांचा मुलगा अक्षय कर्डिले आणि अन्य एकाविरोधात धमकावणे, शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी माया देशमुख यांनी दिला आहे. बुर्‍हाणनगर (ता. नगर) येथील तुळजाभवानी माता मंदिराचे पुजारी अ‍ॅड. अभिषेक विजय भगत यांनी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून न्यायालयाने शुक्रवारी (दि. 8) हा आदेश दिला आहे.

- Advertisement -

अ‍ॅड. भगत यांची बुर्‍हाणनगर व वारूळवाडी (ता.नगर) येथे वडिलोपार्जित मालमत्ता आहे. कर्डिले यांच्याकडून भगत कुटुंबियांना अनेक वर्षांपासून त्रास देत धमकावत होते. तुळजाभवानी मंदिरात सुरु असलेल्या नवरात्री उत्सवात सप्टेंबर 2022 रोजी काही व्यक्तींनी धुडगूस घालून भगत कुटुंबियांना त्रास दिला होता. भगत यांनी भिंगार पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी काहीच कार्यवाही केली नाही.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे आष्टी (जि.बीड) येथे रेल्वेच्या उद्घाटन समारंभास आले असता भगत यांनी सुवेंद्र गांधी यांच्या समवेत त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी एका हॉटेलमध्ये शिवाजी कर्डिले व अभिषेक भगत यांनी समोरासमोर भेट झाली असता, कर्डिले यांनी भगत यांना शिवीगाळ केली होती. त्याचवेळी सुवेंद्र गांधी यांना त्यांच्या मोबाईलवर फोन करत, हातपाय तोडून टाकू, अशी धमकी दिली होती. भगतला पाठीशी घालू नको, असा दम दिला होता.

याबाबत गांधी यांनीही कर्डिले यांच्या विरोधात पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे. त्यांनतर अ‍ॅड. भगत यांना फेब्रुवारी 2023 रोजी अज्ञात व्यक्तीने फोन करून कर्डिले यांच्या विरोधात फिर्याद दिली तर जीवे मारण्याची धमकी दिली. भगत यांनी तातडीने कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी फिर्याद दाखल न करता केवळ तक्रार दाखल करून घेत आरोपींवर कोणतीही कार्यवाही केली नाही. भगत यांनी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली. त्यावर प्राथमिक सुनावणी होऊन न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश कोतवाली पोलिसांना दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या