अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
उध्दव ठाकरे सेनेच्या खासदार फुटीच्या प्रकरणाशी भाजपचा काय संबंध? असा सवाल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी करून, आता ते खासदार खर्या शिवसेनेत गेले आहेत. खरी शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच आहे, असे भाष्य ना. विखे यांनी शुक्रवारी येथे केले. टंचाई आढावा व आषाढी वारीनिमित्त आढावा बैठका विखे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतल्या. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. भाजप जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नितीन दिनकर, दिलीप भालसिंग तसेच विनायक देशमुख यावेळी उपस्थित होते.
ठाकरे सेनेचे खासदार फोडण्याशी भाजपचा काहीही संबंध नाही. संजय राऊत यांचे तसे म्हणणे असले तरी त्यांच्या पक्षात आता कोणी शिल्लक राहिलेले नाही. राऊत एकटेच राहिलेले आहेत आणि त्यांच्या नेत्यांना खुश करण्यासाठी ते आम्हाला शिव्या देत आहेत, असे स्पष्ट करून पालकमंत्री विखे म्हणाले की, खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे. शिंदे सेनेचा राज्यात मुख्यमंत्री झालेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले आहे. हिंदुत्वाचे रक्षण त्यांनी केले आहे. औरंगजेबाच्या कबरीवर ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी फुले उधळली, तेव्हाच त्यांची शिवसेना संपली होती. तसेच ज्यावेळेस त्यांनी काँग्रेसशी युती केली, त्याचवेळी त्यांचे हिंदुत्व संपले होते. त्यामुळे त्यांनी आता आम्हाला शिकवू नये, असा घणाघातही पालकमंत्री विखे यांनी केला.
ममता यांची दहशत होती
पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरांना रोखण्यासाठी कुंपण घालायचे असताना ममता बॅनर्जी यांच्या सरकारने सीमा सुरक्षा दलाला जागाच दिली नाही. त्यामुळे त्यांची जर एवढी लोकप्रियता होती तर त्यांचे 20 खासदार बाहेर पडलेच नसते. मुळात त्यांची दहशत होती. हजारो लोक त्यांच्या काळात मारले गेले. त्यामुळे तिथील लोकांना तृणमूल कौन्ग्रेस नको झाली होती. त्यामुळे आता ममता बॅनर्जी काँग्रेसमध्ये विलीन होतील अशी चर्चा आहे, असेही भाष्य पालकमंत्री विखे यांनी केले. दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील फुटी संदर्भात आपल्याला काहीही कल्पना नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अॅडवोकेट जनरलचे मत घेणार
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतांश मागण्या पूर्ण केल्या आहेत. काहींची अंमलबजावणीही सुरू आहे। प्रक्रियेला थोडा वेळ लागेल, परंतु त्यांच्या सर्व मुद्द्यांवर कार्यवाही नक्की होईल, असे स्पष्ट करताना सातारा व सोलापूर गॅझेटबाबत राज्याच्या अॅडव्होकेट जनरलचे मत मागवणार आहे, असे पालकमंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.




